ठाणे : सुनेने न्याहारी दिली नाही या रागातून 76 वर्षीय सासऱ्याने तिची परवानाधारक रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून हत्या केल्याची घटना ठाण्यातील राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनेनंतर सासरा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऋतू पार्क येथील विहंग शांतीवन या इमारतीत काशिनाथ पाटील हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. गुरुवारी 14 एप्रिलला सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांची मोठी सून सीमा (वय 42 वर्षे) ही त्यांना चहा देण्यास गेली. यावेळी तिने न्याहारी दिली नाही. यावरुन काशिनाथ पाटील आणि त्यांची सून सीमा यांच्यात वाद झाला. त्यावेळी काशिनाथ यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्वरमधून सीमा यांच्या पोटात एक गोळी झाडली. या घटनेनंतर जखमी सीमा यांना उपचारांसाठी ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान सीमा यांचा मृत्यू झाला. 


या प्रकरणी दुसऱ्या सुनेच्या तक्रारीनंतर राबोडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी पाटील यांच्या घरातून हत्येसाठी वापरलेलं रिव्हॉल्वर हस्तगत केलं आहे. राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या माहितीनुसार, आरोपी काशिनाथ पांडुरंग पाटील यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 506 (जीवे मारण्याची धमकी) व्यतिरिक्त आरोपींवर आर्म्स अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या घटनेनंतर काशिनाथ पाटील हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. काशिनाथ पाटील हे एका संघटनेचे उपाध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहे. चिथावणी दिल्याने हा हल्ला करण्यात आला होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत, असं घाटेकर यांनी सांगितलं.


संबंधित बातम्या


जुगारासाठी पोलीस जावयाकडून सासऱ्याची हत्या, नाशिकमधील घटनेने खळबळ


धक्कादायक! मटणाची भाजी का बनवली नाही? पत्नीला मारहाण, पतीविरोधात गुन्हा