Crime News:  बाप-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या एका वडिलाने दारूसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी एका चार वर्षाच्या मुलीला गहाण ठेवले. कर्जाची रक्कम वसूल झाल्यानंतर मुलीचा ताबा द्यावा, असे त्या बापाने म्हटले. 


हृदय हेलावून टाकणारी गोष्ट राजस्थानमधील जयपूरमधील आहे. जयपूरच्या एका भागात एक व्यक्ती त्याची पत्नी, 4 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षाच्या मुलासोबत राहतो. तो भंगार जमा करण्याचे काम करतो आणि त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. नशा करण्यासाठी त्याने एका व्यक्तीकडून काही पैसे उसने घेतले होते. हे उसने घेतलेले पैसे त्याला फेडता येत नव्हते. तर, उसने पैसे देणाऱ्याकडून वसुलीसाठीचा तगादा सुरू होता. 


दारूच्या व्यवसनासाठी त्याने कर्ज घेतले आणि त्यानंतर मुलीला गहाण ठेवले असल्याचे समोर आल्यानंतर लोकांमध्ये संताप उसळला आहे. मुलीला गहाण ठेवल्यानंतर तिच्याकडून भीक मागून पैसे वसूल करून घ्या, असे सांगून त्याने आपली मुलगी कर्जदात्याकडे स्वाधीन केली. 


मुलीने जमवले 4500 हजार रुपये 


यानंतर तो कर्ज देणारा मुलीला घरी घेऊन गेला. ही मुलगी भीक मागून दररोज 100 रुपये आणायची आणि त्या व्यक्तीला द्यायची. आतापर्यंत तिने 4500 रुपये दिले आहेत. 


समुपदेशनात उघड झाली बाब


रेल्वे कॉलनीमध्ये लहान मुले भीक मागत असल्याचे पाहून स्थानिक नगरसेवकाने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची विचारपूस केली आणि ताब्यात घेतले. तेथून त्यांना बाल कल्याण समितीकडे नेण्यात आले. समिती सदस्य अरुण भार्गव यांनी मुलांचे समुपदेशन केले तेव्हा लाजीरवाणी बाबी समोर आली. 


आरोपींवर कारवाई केली जाईल - बालकल्याण समिती


समुपदेशनात मुलाने सांगितले की त्याची आई अपंग आहे आणि वडील मद्यपी आहेत. उसने घेतलेले पैसे फेडण्यासाठी त्याने बहिणीला गहाण ठेवले होते. दुसरीकडे, अरुण भार्गव यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, एसपी ग्रामीण आणि एसपी शहर आमच्याकडे आले होते. याप्रकरणी पोलीस आरोपी बाप आणि भीक मागणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करणार आहेत.