Crime News : नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील  (Trimbak Road) सिबल हॉटेलजवळील सिग्नलवर केवळ दुचाकी बाजूला न घेतल्याच्या रागातून एका कारचालकाने दुचाकीस्वाराचा पाठलाग करत तीन वेळा कट मारला आणि चौथ्या वेळी थेट धडक दिल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 20) रात्री घडली होती. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून संबंधित कारचालकाला पोलिसांनी (Police) सापळा रचून अटक केली आहे. (Nashik Crime News)

शाहरुख फारूक शेख (24, रा. खडकाळी, भद्रकाली, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेचा थरार दुचाकीस्वाराच्या हेल्मेटवरील कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडिओच्या आधारे आणि घटनास्थळी मिळालेल्या कारच्या नंबरप्लेटवरून आरोपीचा शोध घेण्यात आला.

हॉर्न वाजवून दुचाकी पुढे हटवण्यास सांगितलं

प्रेम प्रफुल्ल बोंडे (21, रा. सिटी मॉलच्या मागे, संभाजी चौक, उंटवाडी) याने गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री तो आपल्या आतेभावासोबत (आर्यन) दुचाकीवरून (एमएच 04 इके 7345) त्र्यंबकरोडने जात होता. यावेळी सिबल हॉटेलजवळील सिग्नलला लाल दिवा लागलेला असताना ते थांबले. त्यावेळी पाठीमागून काळ्या रंगाची कार (एमएच 15 जेए 5558) आली व कारचालकाने जोरजोरात हॉर्न वाजवून दुचाकी पुढे हटवण्यास सांगितले. मात्र, सिग्नल लाल असल्याने प्रेमने दुचाकी जागेवरच ठेवली.

दोन्ही तरुण गंभीर जखमी

या घटनेने संतप्त झालेल्या कारचालकाने दुचाकीस्वारांचा सिबल हॉटेल ते सिटी सेंटर मॉलदरम्यान पाठलाग केला. त्यादरम्यान त्याने तीन वेळा कट मारून दुचाकीला घासण्याचा प्रयत्न केला. यानंतर चौथ्यांदा कारचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोघे रस्त्यावर पडले आणि दोघेही गंभीर जखमी झाले. यानंतर कारचालक शाहरुख शेख झाला फरार होता.  

सापळा रचून कारचालकाला अटक 

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात शेख याच्याविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व अपघाताचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सापळा रचून शाहरुख फारुक शेख या कारचालकाला अटक केली आहे. तर शाहरुख  शेख याला न्यायालयात हजार केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pahalgam Terror Attack: वडिलांना गोळी लागली, आईला पॅरालिसीस; रक्ताने माखलेल्या हातांनी जीव वाचवण्याची धडपड; डोंबिवलीच्या हर्षलने सांगितला थरारक अनुभव

PM Modi Pakistan: पंतप्रधान मोदींच्या पाच वाक्यांनी पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप, मॉनेटरी स्ट्राईकमुळे निर्देशांक 2500 अंकांनी कोसळला