Manmad: देशात नवजात बाळांना उकीरड्यावर टाकून देणाऱ्यांची विकृती काही कमी व्हायला तयार नाही. राज्यात असाच एक संतापजनक प्रकार घडलाय. अवघ्या एका महिन्याच्या बाळाला ट्रेनच्या शौचालयात टाकून अज्ञात पालक पसार झाल्याची घटना घडली आहे. मुंबई देवगिरी एक्सप्रेसमध्ये शौचालयात ही एक-दीड महिन्याची मुलगी झोपलेली दिसल्यानं मोठी खळबळ उडाली. या बाळाच्या अज्ञात पालकांविरोधात मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लहानगं बाळ शौचालयात झोपलेलं दिसल्यानं पालकांच्या विकृतीचा कळस पहायला मिळाला.
नक्की काय झाले?
मुंबई देवगिरी एक्सप्रेसच्या शौचालयात एक दीड वर्षाच्या बाळाला टाकून या चिमुकलीचे अज्ञात पालक पसार झाल्याचे सांगण्यात आले. ट्रेनच्या शौचालयात एक दीड वर्षाची मुलगी कमोडच्या शेजारी ओढणीवर झोपलेली आढळली. यानंतर रेल्वेतील प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. यावेळी मनमाड पोलीस ठाण्यात या बाळाच्या अज्ञात पालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पालकांचा शोध सुरु
अवघ्या एक महिन्याच्या बालकाला देवगिरी एक्स्प्रेसच्या बाथरूम ठेवून पालक पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून नांदेडकडून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसने औरंगाबाद स्थानक सोडल्यानंतर बाथरूममधून लहान मुलांचा रडण्याचा आवाज आल्याने प्रवशांनी पोलिसांशीही संपर्क साधला असता मनमाड रेल्वे स्थानकावर बालकाला उतरविण्यात आले असून त्यास नाशिक येथे बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे..लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात पालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला पोलिस पालकांचा शोध घेत आहेत..