Coronavirus fake vaccination certificate : कोरोनाच्या पहिला लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये बोगस लसीकरण प्रमाणपत्राचे जाळे पोलिसांनी उद्धवस्त केले आहे. काही रुपयांमध्ये लोकांना दोन्ही लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र या टोळीकडून दिले जात होते. इतकंच नव्हे तर या बनावट प्रमाणपत्राची नोंदणी कोविन अॅप वरसुद्धा दिसत होती. या प्रकारामुळे पोलिसांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा लसीकरण वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, धारावीमध्ये लसीकरणाच्या बनावट प्रमाणपत्राची एक हजार रुपयांत सर्रास विक्री करण्यात येत होती. लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतरही धारावीतील लसीकरणावर प्रशासन विशेष लक्ष देत आहे. याच धारावीत बनावट लसीकरणाचे नवे प्ररूप उभे राहिले आहे. अवघ्या एक हजार रुपयांत लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्याच्या प्रमाणपत्राची सर्रास विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. एकही दिवस मुंबई बाहेर न जाता बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.


बनावट लसीकरण प्रमाणपत्र कसे दिले जायचे?


धारावीतील एका सायबर कॅफे मालकाकडून हे प्रमाणपत्र मिळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सेकारन फ्रान्सिस नाडर (वय ३६) हा सायबर कॅफे मालक अवघ्या एक हजार रुपयांमध्ये करोना लशीच्या मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र पुरवत होता. पोलिसांनी एका ग्राहकाला त्याच्याकडे पाठवले. नाडरने त्याला लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याला धारावी पोलिसांनी बुधवारी अटक केली. पोलिसांनी पाठवलेला ग्राहक मुंबईत असतानाही बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आरोपीने यापूर्वी किमान चार जणांचे लसीकरण केल्याची माहिती हाती लागली असल्याचे पोलिसांनी सांगितले.


आरोपीकडे पाठवण्यात आलेल्या ग्राहकानेही लस घेतल्याचे प्रमाणपत्र कोविन या संकेतस्थळावर दिसते आहे. अधिकृतरित्या लसीकरण केल्यावर दोन मात्रांमधील बॅच क्रमांक वेगवेगळा असतो. पण या प्रकरणात दोन्ही मात्रा एकाच बॅचमध्ये झाल्याचे दिसत आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.