चंद्रपूर: देशभरात उद्या नवरात्री उत्सावाची तयारी सुरू असून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे दिसून येते. बदलापूमधील शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातील विविध जिल्ह्यात महिला व अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे, महिला अत्याचाराच्या घटनांवरुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाकडून याबाबत कडक पाऊले उचलण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, दररोज नव्या ठिकाणावर अशा घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता, चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कोरपना येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात आरोपी अमोल लोडे याला अकोल्यातुन अटक करण्यात आली आहे. आरोपी अमोल लोडे युवक काँग्रेसचा (Congress) कोरपना शहर अध्यक्ष आहे. कॉन्व्हेंट शाळेत शिक्षक असलेल्या लोडे याने 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, या घटनेचे राजकीय पडसादही उमटताना दिसून येत आहेत.  


उन्हाळ्यात ज्युनिअर IAS class घेण्याचे बहाण्याने आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला शाळेत बोलावून अत्याचार केला. सोबतच तुझ्या आई-वडिलांना जीवानिशी मारून टाकेन धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली होती. मात्र, पीडित मुलीने मैत्रिणीकडे या घृणीत प्रकरणाची वाच्यता केल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी, पोलिसांनी pocso कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पीडित मुलींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलीस सर्व बाबी तपासून पाहणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे. दुसरीकडे कोरपना येथे झालेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणामुळे स्थानिक लोकं अतिशय संतप्त आहे. स्वयंस्फूर्तीने आज कोरपना शहरातली सर्व दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. स्थानिक नागरिकांनी एकत्र येत निषेध मोर्चा काढला आणि उद्या सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी मिळून कोरपना बंदची हाक देण्यात आली आहे. शाळकरी मुलीच्या बलात्कार प्रकरणात आरोपी असलेला शिक्षक आणि कोरपना शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष अमोल लोडे याची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी पक्षातून लोडे याला निष्काषित केल्याचं पत्र जारी करत लोडे याच्या कृत्याचा निषेध केलाय. दरम्यान, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी कोरपना येथे शाळेत जाऊन या प्रकरणाची चौकशी केली आहे.


हेही वाचा


4,500 रुपयांत पितळाचे दोन हंडे घेतले, त्यावर एकनाथ शिंदेंचे नाव टाकले; लाडक्या बहिणीच्या प्रेमाने मुख्यमंत्री भावूक