Mumbai News : जामीनावर तुरुंगातून बाहेर पडलेल्या एका गुंडाला मोठ्या आवाजात गाणी वाजवणं आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करणं महागात पडलं आहे. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी या गुंडावर गुन्हा दाखल करुन त्याला पुन्हा एकदा अटक केली. मुंबईतील (Mumbai) कुलाबा (Colaba) परिसरात 28 जुलै रोजी ही घटना घडली होती. या जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून 4 ऑगस्ट रोजी आरोपीसह आणि सहा जणांना अटक केली.
दरवेझ मोहम्मद सय्यद उर्फ दरवेझ भाई असं या आरोपीचं नाव आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली होती. या गुन्ह्यात त्याला आठ महिन्यांनी जामीन मिळाला आणि 28 जुलै रोजी त्याने आणि त्याच्या काही साथीदारांनी जल्लोष साजरा केला. मोठ्या आवाजात गाणी वाजवत, घोषणाबाजी करत आणि फटाके फोडत त्याचं स्वागत करण्यात आलं. यावेळी दरवेझ हा बीएमडब्लू कारच्या सनरुफमध्ये उभं राहून हातात सिगरेट घेऊन सगळ्यांना हात हलवून दाखवत होता.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा आणि अटक
त्याच्या जवळच्या व्यक्तीने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर अपलोड केला आणि नंतर तो व्हायरल झाला. एसबीएस रोडवरुन रॅली काढण्यात आली होती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुलाबा पोलिसांनी रॅली काढून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी 4 ऑगस्ट रोजी शाहबाज सय्यद (वय 28 वर्षे), दिलशाद अब्दुल रशीद शेख (वय 24 वर्षे) आणि कल्लू उर्फ राज (वय 21 वर्षे) आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्व आरोपी कुलाबा आणि कफ परेड इथले रहिवासी असल्याचं समजतं.
क्षुल्लक कारणावरुन हल्ला आणि आर्थर रोड तुरुंगात रवानगी
दरवेझ याचं कुलाबा इथे गॅरेज आहे. जल्लोषासाठी त्याने त्याच्या एका क्लायंटची बीएमडब्ल्यू कार वापरली होती. कुलाब्यात दरवेझ भाई म्हणून ओळखल्या जाणार्या दरवेझ मोहम्मद सय्यदविरोधात 2021 मध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. क्षुल्लक कारणावरुन त्याने एका व्यक्तीवर स्क्रू डायव्हरने हल्ला केला होता. त्यानंतर आठ महिन्यांनी जामीनावर सुटका करण्यात आली आणि 28 जुलै रोजी कुलाबा इथे त्याच्या स्वागतासाठी रॅली काढण्यात आली.