रत्नागिरी: गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत असून रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण येथे आता सेवानिवृत्त शिक्षिकेचा राहत्या घरीच खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्याकांडामुळे चिपळूणमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. वर्षा जोशी (63 वर्षे) असं या सेवानिवृत्त शिक्षिकेचं नाव आहे. याप्रकरणी, अधिक तपास सुरू असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
चिपळूण शहरातील रावतळे परिसरातील घरात वृद्ध शिक्षिकेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. या महिलेच्या अंगावर अनेक जखमा असून पोलसांनी मृतदेह शवविच्छदेनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. विशेष म्हणजे घरातील CCTV कॅमेराची हार्ड डिस्क देखील गायब करण्यात आली आहे. त्यामुळे, मारेकऱ्यांनी कट रचून पद्धतशीरपणे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड होत आहे. तसेच, आरोपींना पकडण्याचं आव्हान आता चिपळूण पोलिसांसमोर आहे.