Bijapur Naxal News गडचिरोली : छत्तीसगढच्या बिजापूर (Bijapur) जिल्ह्यातील गांगलूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पीडिया जंगलात पोलीस आणि  नक्षलवाद्यांमध्ये (Naxal) मोठी चकमक झालीय. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी 12 नक्षलवाद्यांचा (Naxal) खात्मा केलाय. तसेच पीडिया जंगलात माओवाद्यांनी उभारलेला तात्पुरता तळ उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले आहे. या कारवाई मध्ये पोलिसांनी (Gadchiroli Police) घटनास्थळावरुन मोठ्याप्रमाणात स्फोटके आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. तर भूसुरुंग स्फोटामुळे दोन जवान जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. 


भीषण चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्थान


देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याचा उद्देशाने नक्षलग्रस्त भागात गेल्याकाही दिवसांमध्ये  नक्षलवाद्यांचा (Naxal) वावर वाढला असल्याचे समोर आले आहे. या नक्षलवाद्यांच्या कारवाई विरोधात पोलिसांनी देखील आपली कंबर कसली असून प्रत्येक बारीक सारिक गोष्टींकडे पोलीस लक्ष देऊन आहे. अशाच एका मोठ्या कारवाईत सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले आहे.


गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या माओवादी विरोधी मोहिमेअंतर्गत 8 मे रोजी प्रतिबंधित सीपीआय माओवादी संघटना (PLGA) कंपनी क्रमांक 2 कमांडर वेल्ला, गांगलूर क्षेत्र समितीचे सचिव दिनेश मोदियाम आणि इतर 100-150 सशस्त्र माओवाद्यांना अटक करण्यात आली. गंगलूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पीडियाच्या जंगलात, डीआरजी विजापूर, डीआरजी दंतेवाडा, डीआरजी सुकमा, बस्तर फायटर, एसटीएफ आणि कोब्रा 210, 202, 85 सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने ही माओवादीविरोधी कारवाई केली होती.


नक्षलवाद्यांचा तळ उध्वस्त 


त्यानंतर या परिसरात शोध मोहिमेदरम्यान, 10 मेच्या सकाळी 6 वाजताच्या सुमारास पीडिया जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. बराच वेळ चाललेल्या या चकमकीनंतर घटनास्थळावरून 12 माओवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. तर बीजीएल लाँचर, 12 बोअरची बंदूक, देशी बनावटीची रायफल, बीजीएल सेल, प्रचंड प्रमाणात स्फोटके, माओवाद्यांचा गणवेश, काठी, औषधे, प्रतिबंधित माओवादी संघटनेचे प्रचार साहित्य आणि माओवादी साहित्य हे देखील घटनास्थळावरुन जप्त करण्यात आले आहेत. सध्या पोलीस या परिसरात अधिक शोध घेत आहेत.  


या आधीच्या कारवाईत 10 नक्षलवादी मारले गेले


या आधी 30 एप्रिल रोजी बस्तर पोलिसांना नारायणपूर चकमकीत मोठे यश मिळाले होते. नक्षलवादी आणि जवानांमध्ये सुमारे 9 तास चाललेल्या चकमकीत जवानांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये 3 महिला आणि 7 पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे. 29 एप्रिल रोजी नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच सैनिक नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात शोधासाठी निघाले होते. रात्रभर शोध घेतल्यानंतर 30 एप्रिलला सकाळी डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांचा अबुझमाडमधील ताकामेटाच्या जंगलात नक्षलवाद्यांशी सामना झाला. त्यामध्ये 10 नक्षलवादी मारले गेले तर  घटनास्थळावरून एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.


इतर महत्वाच्या बातम्या