छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही देशभरातून गुन्हेगारी आणि खुनाच्या मन हेलावून टाकणाऱ्या कहाण्या समोर असताना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात काळजाचं पाणी करणारी घटना समोर आली आहे. सिल्लोड तालुक्यातील मुगलपुरा परिसरात एका चार वर्षांच्या मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. एका जोडप्याने या मुलीला काही दिवसांपूर्वी दत्तक घेतले होते. मात्र, त्यांनीच या चिमुरड्या मुलीला अक्षरश: हालहाल करुन संपवले. या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुगलपुरा परिसरात हत्या झालेल्या मुलीचे नाव आयत फईम शेख असे आहे. फईम आणि फौजिया फईम शेख आयुब या पती-पत्नीला पोलिसांनी याप्रकरणात अटक केली आहे. फईम आणि फौजिया यांना चार मुलं होती. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी जालन्यातून 5 हजार रुपये देऊन आयत हिला विकत घेतले होते. मात्र, तिला घरी आणल्यानंतर या दोघांनी आयत हिच्यावर अनन्वित अत्याचार केले. अवघ्या 4 वर्षांच्या या चिमुकलीला गेल्या 15 दिवसांपासून उपाशी ठेवण्यात आले होते. फईम आणि फौजिया आयतला बेदम मारहाण करत होते.
या दोघांनी चिमुरडीच्या अंगावर अनेक ठिकाणी जळत्या लाकडाने चटके दिले होते. तसेच फईम आणि फौजियाने चिमुरडीचे हात आणि पाय पिरगळून तोडले होते. तळहात आणि पायाच्या तळव्याच्या जॉईंटमधून तिची हाडे पिरगळून तोडण्यात आली होती. तिच्या डोक्यात आणि पाठीत जोरजोरात मारून तिला गंभीर जखमी करण्यात आले होते. या अमानुष मारहाणीमुळे चिमुरडी आयत व्हिवळत होती. या अनन्वित अत्याचारामुळे गोंडस दिसणाऱ्या आयतचा चेहरा अक्षरश: काळवंडला होता. अखेर या मारहाणीमुळे बुधवारी रात्री आयत शेख हिने प्राण सोडले होते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर फईम आणि फौजिया शेख यांनी याचा पत्ता कोणालाही लागू नये, यासाठी परस्पर तिचे अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न केला.
चिमुरडीचा मृत्यू झाल्यानंतर फईम आणि फौजिया शेख यांनी तिचा मृतदेह सिल्लोड येथील एका कब्रिस्तानात नेला. याठिकाणी ते परस्पर आयतचा दफनविधी करुन पुरावे नष्ट करण्याच त्यांचा प्रयत्न होता. मात्र, आजुबाजूच्या लोकांना हा सगळा प्रकार लक्षात आला. त्यावेळी लोकांनी सिल्लोड पोलिसांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कब्रिस्तानाचा जाऊन हा दफनविधी रोखला. पोलिसांनी आयत शेख हिचा मृतदेह ताब्यात घेऊन तो सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तेव्हा या चिमुरडीला हालहाल करुन मारण्यात आल्याची बाब उघड झाली. या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी दोघा फौजिया आणि फईम शेख यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
आणखी वाचा