मुंबई: चेंबूरमध्ये झालेली विवाहतेची हत्या ही लव्ह जिहाद प्रकारातील असून पोलिसांनी त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो आणि अॅस्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करावा अशी मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे.
चेंबूर मधील रहिवासी असलेल्या रुपाली चंदनशिवे यांची तिच्या पतीने धार्मिक रीतिरिवाजाचे पालन करीत नाही म्हणून हत्या केली होती. आज रुपालीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि नितेश राणे हे गेले होते. या बाबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असं आश्वासन दिलं. तर नितेश राणे यांनी पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली. तसेच मयत रुपालीबाबत अॅट्रॉसिटी, पोस्को का लावला नाही? असा प्रश्न विचारला. तसचे रुपाली यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली.
भाजप नेते नितेश राणे म्हणाले की, "रुपाली यांच्या वडिलांना आणि तिच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण दिलं पाहिजे. मुलगी अल्पवयीन आहे, पण अजून पोस्को अंतर्गत कलम लावण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा देखील नोंद करण्यात यावा."
आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे आणि चेंबुर प्रकरणासंबंधी संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करणार आहे असंही नितेश राणे यांनी सांगितलं. जर त्या कुटुंबीयांना काही झालं तर आम्ही पोलिसांना सोडणार नाही असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
धार्मिक रीतीरिवाज पाळत नाही आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मीय लग्न केलेल्या पतीने पत्नीची गळा चिरून भर रस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये घडली. पहिल्या पत्नीकडून मूल होत नाही म्हणून इक्बाल शेख नावाच्या या आरोपीने रुपाली चंदनशिवे हिच्याशी तीन वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. त्यांना एक दोन वर्षाचा मुलगाही आहे. मात्र लग्नानंतर रुपालीला मुस्लिम रीतिरिवाज जमत नव्हते. यावरून तिचं आणि इक्बालची रोज भांडण व्हायचं. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून ते विभक्त झाले होते. मात्र शुक्रवारी संध्याकाळी त्याने भेटण्यासाठी रुपालीला नागेवाडी भागात बोलावलं आणि भर रस्त्यात तिच्यावर चाकूने वार करून पळ काढला. यात रुपालीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी इक्बालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.