Chandrapur News : आपली मुलं टीव्ही-मोबाईल फोनवर काय पाहतात आणि याचा त्यांच्या बालमनावर काय परिमाण होतो याचं धक्कादायक वास्तव चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात उघडकीस आलं आहे. टीव्हीवरचे क्राईम शो (Crime Show) पाहून अवघ्या दहा वर्षांच्या एका मुलाने स्वतःच्या अपहरणाची (Kidnapping) अशी काही स्टोरी तयार केली की पोलीस देखील चक्रावून गेले.


नागपूर-चंद्रपूर हायवेवरील पडोली पोलीस स्टेशन... दुपारची वेळ ... जवळच्याच गावातील काही गावकरी अचानक एका दहा वर्षीय मुलाला घेऊन त्याचं अपहरण झालं म्हणून पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले... पोलिसांनी मुलाचा जबाब घेतला आणि त्याची कहाणी ऐकून सुन्न झाले.


पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या माहितीनुसार, "28 तारखेला लहोजीनगरमधील काही ग्रामस्थ आणि पालक त्यांच्या दहा वर्षाच्या मुलाला आमच्याकडे घेऊन आले. तो मुलगा रडत होता. मुलाचं अपहरण झाल्याचं पालकांचं म्हणणं होतं. याबाबत मुलाने अधिक माहिती दिली. तो म्हणाला की, शाळेत जात असताना एका पांढऱ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या दोन इसमांनी आपल्याला उचललं आणि जबरदस्ती गाडीत भरुन अपहरण केलं. चंद्रपूरच्या दिशेने जात असताना अचानक गाडीचा वेग कमी झाला. त्यामुळे आपण गाडीतून उडी मारली आणि पळत घरी गेलो. ही बाब अतिशय गंभीर असल्याने आम्ही तातडीने मुलाचं अपहरण झालं त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज बारकाईने तपासले, लोकांकडे चौकशी केली. मुलाने सांगितल्याप्रमाणे 8012 नंबरच्या पिक-अप गाडीचा देखील माग काढला. मात्र अपहरणाचे काहीच पुरावे सापडले नाहीत. मुख्य म्हणजे अपहरण झालेला मुलगा प्रत्येक वेळी अपहरणाची तीच स्टोरी कुठेच न चुकता सांगत होता. त्यामुळे आम्हाला संशय आला. अखेर आम्ही मुलाला विश्वासात घेऊन खरं काय झालं ते वदवून घेतलं. परंतु त्याने सांगितलेलं कारण ऐकून चक्रावलो. शाळेला सुट्टी मारली म्हणून पालकांनी रागावू नये, मारु नये म्हणू या अवघ्या दहा वर्षाच्या मुलाने स्वतःच्या अपहरणाची स्टोरी तयार केली. आपल्या अपहरणाचा बनाव रचण्याची आयडिया त्याला कुठून मिळाली याचा अधिक तपास केला असता याचं मूळ टीव्ही आणि मोबाईल फोनवरचे क्राईम शोमधून. क्राईम शो पाहून या मुलाने स्वत:च्या अपहरणाची कथा रचली."


पोलिसांच्या सतर्कतेमुळे या अपहरणाची खरी कहाणी समोर आली. मात्र टीव्ही-मोबाईल फोनवरील नको ते कन्टेन्ट पाहून बालमनांच्या कल्पनाशक्तीला कसे पंख फुटतात हे देखील दिसून आलं आहे. त्यामुळे पालकांनो जरा मुलांकडे लक्ष द्या.