CBI Busts Racket:  राज्यसभेची खासदारकी आणि राज्यपालपदी नेमणुकीचे आमिष दाखवून काहीजणांची कथितपणे 100 कोटींची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारी आंतरराज्यीय टोळीचा भांडाफोड झाला आहे.  सीबीआयने या प्रकरणी काही ठिकाणी छापे मारले. यामध्ये चौघांना अटक करण्यात आली आहे (CBI Busts Racket). 









अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका छाप्याच्या दरम्यान एका आरोपीने सीबीआय अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि पसार झाला. या आरोपीच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. 


सीबीआयने या फसवणुकी प्रकरणी महाराष्ट्रातील लातूरमधील कमलाकर प्रेमकुमार बंदागर,  कर्नाटकमधील बेळगाव येथील रविंद्र नाईक आणि दिल्ली-एनसीआर येथील महेंद्र पाल अरोरा, अभिषेक बुरा आणि मोहम्मद एजाज खान यांना अटक केली आहे. 






प्राथमिक तक्रारीनुसार, आरोपी बंदागर हा स्वत: ची वरिष्ठ सीबीआय अधिकारी म्हणून ओळख करून देत असे. आपली वरिष्ठ पातळीवर चांगले संबंध असल्याचे सांगत आरोपी बुरा, अरोरा, खान आणि नाईक यांना मोठ्या रक्कमेसाठी एखादं काम आणण्यासाठी आणायला सांगत असे. 


आरोपींनी राज्यसभेची खासदारकी देणे, राज्यपाल म्हणून नियुक्ती करणे आणि केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या अखत्यारीत असणारे महामंडळे, विविध संस्था यांच्या अध्यक्षस्थानी नेमणूक करण्याचे आश्वासन देऊन मोठी रक्कम वसूल करण्याचा कट आखला होता. 


सीबीआयला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी बुरा याने आरोपी बंदगर याच्यासोबत चर्चा केली होती. 


आरोपींकडून  100 कोटींच्या बदल्यात राज्यसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्याच्या नावाखाली काहींची फसवणूक करण्यात येणार होती. यासाठी आरोपींकडून वरिष्ठ नोकरशहा आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नावांचा वापर होणार होता. जेणेकरून राज्यपाल पद आणि खासदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांची फसवणूक करता येऊ शकेल. मात्र, वेळीच सीबीआयला याचा सुगावा लागला आणि ही टोळी अटकेत आली.