मुंबई : 'बुली बाई' अॅप प्रकरणी पहिल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी कारवाई करत बंगळुरुमधून ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विशाल कुमार आहे. पण धक्कादायक म्हणजे तो या प्रकरणातील मुख्य आरोपी नसून सह-आरोपी असल्याचं समोर आलं आहे. उत्तराखंडमध्ये ज्या महिलेला ताब्यात घेतलं आहे ती या 'बुली बाई' प्रकरणाची मास्टर माईंड असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 'बुली बाई' एक असं अॅप्लिकेशन आहे, जिथे प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो लावले जात होते आणि त्यांची बोली लावली जात होती.


विशाल कुमार आणि त्या महिलेची मैत्री सोशल मीडियावर झाली होती. त्यानंतर दोघांनी एकत्र येऊन हा अँप तयार केला. सोशल मीडियावर अकाऊंट बनवताना त्यांनी शीख समुदायाचा नावाचा वापर केला होता. विशाल कुमारने खालसा सुप्रीमीस्ट नावाने अकाऊंट बनवलं होतं जे 31 डिसेंबरला बदलले आणि खोटे खालसा अकाऊंट बनवून त्याला फॉलो करू लागले. शीख समुदायाचा नावाने अकाऊंट बनवलं होतं जेणेकरून लोकांना वाटावं की हे अकाऊंट शीख लोकांनी बनवलं आहे. 


ज्या महिलेला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ती महिला जे तीन मुख्य अकाऊंट आहेत ते हँडल करत होती. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला मिळालेल्या तक्रारीनंतर सायबर सेल या प्रकरणात चौकशी करत होतं. सदर महिलेला मुंबईत घेऊन येण्याची प्रक्रिया सुरू आहे. 


मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड 
पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बुली बाई' अॅप्लिकेशनवर जवळपास 100 प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. ज्यामध्ये काही पत्रकार महिला आणि त्यांचे फोटोही अपलोड करण्यात आले होते. तसेच त्यांची बोलीही लावली जात होती. 


या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेलनं ट्विटरला लिहिलं होतं. कारण 'बुली बाई'शी संबंधित तीन ट्विटर हँडलची माहिती पोलिसांना मिळाली. या अॅप्लिकेशनची तक्रार आल्यानंतरच मुंबई पोलिसांनी 'बुली बाई' अॅप्लिकेशन तयार करणाऱ्या डोमेन गुगलला पत्र लिहून हे अॅप्लिकेशन बंद करण्याचे निर्देश दिले होते. 


संबंधित बातमी : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha