Buldhana News Update :  तहसीलदारांच्या डिजिटल सहीने बनावट दस्त बनवणाऱ्या संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सैय्यद साजीद सैयद नुरोददीन (रा. पारपेट, मलकापूर),  आजम खान अय्युब खान आणि वसीम मुश्ताक अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सर्व संशयितांना न्यायालयाने 17 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 


काही दिवसांपूर्वी मलकापूर (जि. बुलढाणा) येथील तहसीलदार  बाळासाहेब सुभाष दराडे  यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आजम खान अय्युब खान याने डिजिटल स्वाक्षरीचा अवैध वापर करून एका व्यक्तीला वय, राष्ट्रीयत्व आणि रहिवाशी दाखला तयार करुन दिला होता, असे दराडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे मलकापूर शहर पोलीस ठाण्यात खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 13 मे रोजी आजमखान अयुबखान याला पोलिसांनी अटक केली.  


पोलिसांनी याबाबात अधिक तपास केल्यानंतर यामध्ये वकील वसीम मुश्ताक याचा देखील समावेश असल्याचे समोर आले. हा वकील अशा प्रकारची बनावट प्रमाणत्र देत असल्याचे समोर आल्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यालाही अटक केली. या वकीलाकडे अधिक चौकशी केली असता एका मदरसशातील शिक्षक सैय्यद साजीद सैयद नुरोददीन हा बनावट प्रमाणपत्र तयार करून देत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही बेड्या ठोकल्या. सर्वांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना काल उशिरा न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना 17 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 


या प्रकारात आणखी कोणाचा समावेश आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मलकापूर शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांनी शासनाने प्राधिकृत केलेल्या सेतू व तहसील कार्यालयामधून प्रमाणपत्र दाखले न घेता ज्यांनी अटक केलेल्या संशयितांकडून प्रमाणपत्र घेतले असतील त्यांनी ते प्रमाणपत्र  तातडीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात जमा करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक विजयसिंग रजपूत यांनी केले आहे.


दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून हा मौलवी संबंधीत वकीला मार्फत बनावट प्रमाणपत्र देण्याचे काम करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. यात आरोपींची आणखी संख्या वाढू शकते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.