पुणे: पुणे शहर परिसरातील येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या न्याती बिल्डिंग समोरील झाडाझुडपात बेवारस अर्धवट मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली आहे. येरवड्यातील न्याती बिल्डिंगच्या समोरील झाडाझुडपांमध्ये अर्धवट सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाच्या कमरेच्या खालील भाग थोडाच शिल्लक असून, वरील भाग कुत्र्यांनी पूर्णपणे खाल्याचं दिसून येत आहे.
याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाकडून काल (गुरुवारी ता. 7) सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास येरवडा पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, या मृतदेहाला आठ ते दहा दिवस झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून, शरीराचा बराचसा भाग कुत्र्यांनी खाल्लेला दिसून येतो आहे. याप्रकरणात पुढील तपास येरवडा पोलीस करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या मृतदेहाच्या कमरेपासून खालील भाग थोडा शिल्लक असून, कवटी व वरील भाग कुत्र्यांनी पूर्णपणे खाल्लेला दिसून येत आहे. हा मृतदेह बेवारस व्यक्तीचे असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. या भागाच अनेक बेवारस लोक, बेघर लोक झोपतात, आश्रय घेतात. त्यांच्यापैकी कोणाचा हा मृतदेह असावा, अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे, याबाबतची माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली आहे.