पुणे: पुणे शहरात विमानात बॉम्ब ठेवल्याच्या अफवांचे कॉलमुळे विमान प्रशासनाला हैराण करून सोडल्याची घटना मागील काही दिवसात घडली.अशातच आता बुधवारी कात्रज परिसरातील एका वैद्यकीय महाविद्यालयालाही धमकीचा ई-मेल आला आहे. या ईमेलमध्ये महाविद्यालय आणि वस्तीगृहे उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी तसेच बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथकाने तातडीने तपासण्या केल्या असता कोणताही बॉम्बसदृश्य वस्तू आढळली नाही. त्यामुळे महाविद्यालय आणि प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.


पोलिसांनी हा ईमेल गांभीर्याने घेतला आणि महाविद्यालयाच्या परिसराची तपासणी केली. यामध्ये काही संशयास्पद सापडलं नाही. मेल आल्यानंतर बी. डी. डी. एस.च्या पथकाच्या मदतीने महाविद्यालयाच्या आवारात काहीही संशयास्पद सापडले नाही. पर्वती दर्शनमधील रहिवासी डॉ. मंदार दत्तात्रय करमरकर (वय 55) यांनी संबधित ई-मेल पाठवणाऱ्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात ई-मेल पाठवणाऱ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 


याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  एका व्यक्तीने महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना ईमेल आयडीवर दोनदा ई-मेल पाठवून महाविद्यालय आणि वसतिगृह परिसरात बॉम्बस्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं, त्यामध्ये तामिळनाडूतील एका घटनेचा संदर्भ देखील देण्यात आला होता. त्यामुळे या मेलची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलिसांनी महाविद्यालय आणि वसतिगृहाच्या परिसरात कसून शोध घेतला. बी. डी. डी. एस.च्या पथकाला देखील बोलावण्यात आलं. या घटनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावारण निर्माण झालं होतं. ई- मेलच्या तांत्रिक तपासणीमध्ये तो परदेशातून पाठवण्यात आल्याचे आढळून आलं आहे.


विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा


काही दिवसांपुर्वी इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या विमानात बाॅम्ब ठेवल्याचा मेसेज सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अफवा पसरविल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांकडून सोशल मिडिया खातेधारकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


2 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या विविध विमानात बाॅम्ब ठेवण्यात आला आहे, असा मेसेज पाठवण्यात आला होता. हा मेसेज आल्यानंतर या घटनेची माहिती लोहगाव विमानतळ प्रशासन, तसेच पोलिसांना कळवण्यात आली. बॉम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळी दाखल झाले. विमानतळ, तसेच विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र, बाॅम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.