नवी दिल्ली : आजकाल तरुणाई रील्सच्या (Reels) आहारी गेल्याचं दिसतेय. अनेक तरुण-तरुणी हे रील्स (Reels) पाहण्यात अन् करण्यात मग्न असतात. सोशल मीडियाच्या (Social media) युगात सध्या तरुणाईमध्ये रील्स फॉरमॅट मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. रील्समधून अनेकजण आपली प्रतिभा दाखवतात, पण याच रील्समुळे गुन्हेही वाढत असल्याचे दिसतेय. बिहारमधील बेगूसराय येथील एक घटना सध्या चर्चेत आहे. पतीने रील्स बनवायला विरोध केल्याने संतापलेल्या पत्नीने पतीचा जीव घेतला. पत्नीने माहेरच्या लोकांच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केला. या धक्कादायक प्रकारानंतर बेगूसराय येथे खळबळ माजली.
बेगूसराय जवळील फफौत गावात ही धक्कादायक घटना घडली. पत्नीला रील्स करण्यात विरोध करण पतीच्या जिवावर बेतलं. पत्नीने माहेरच्या लोकांच्या मदतीने पतीला कायमचं संपवलं. महेश्वर कुमार राय असं मृत व्यक्तीचं नाव आहे. महेश्वर यांच्या हत्येची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महेश्वर कुमार राय यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याशइवाय पत्नीला तपासासाठी ताब्यात घेण्यात आलाय. मृत महेश्वर कुमार राय यांच्या वडिलांच्या (रामप्रवेश राय) तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
मृताचे वडिल रामप्रवेश राय म्हणाले की, महेश्वरचं सात वर्षांपूर्वी राणी कुमारी हिच्यासोबत लग्न झालं होतं. महेश्वर हा कोलकाता येथे मजूर म्हणून काम करतो. तो नुकताच घरी परतला होता. गेल्या काही दिवसांपासून राणी कुमारी इंस्टाग्रामवर खूप व्हिडिओ बनवत होती. महेश्वर याने त्या व्हिडीओला विरोध केला. पण राणीने काहीही ऐकलं नाही.
रविवारी महेश्वर नऊ वाजण्याच्या आसपास सासुरवाडी फफौतला गेला. रात्री साडेदहा वाजण्याच्या आसपास रामप्रवेश राय याला दुसऱ्या मुलाचा फोन आला. त्याने आपल्या भावाला फोन केला, पण फोन दुसराच कुणीतरी उचलला होता. त्यात गोंधळाचा आवाज येत होता. त्यानंतर त्याने फोन करुन घरच्यांना सूचना दिली. महेश्वर याच्या घरच्यांनी फफौतला धाव घेतली.
महेश्वर याचे कुटुंबीय फाफौत येथे पोहोचले तेव्हा सर्वजण सासरच्या घरातून बेपत्ता होते. महेश्वर याचा मृतदेह तेथेच पडून होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास करून मृतदेह ताब्यात घेतला. रील्स बनवण्यास विरोध केल्यामुळे आपल्या मुलाला मारुन टाकण्यात आल्याचा आरोप महेश्वर याच्या वडिलांनी केला. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यांनी तात्काळ राणीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली.