रायगड : मुंबईसह उपनगरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून अंमली पदार्थांची तस्करी किंवा अंमली पदार्थांची अवैध विक्रीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. त्यातच, रायगड पोलिसांनी (Police) मोठी कारवाई केली असून  494 किलो गांजा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजा येथून तब्बल 1 कोटी रुपये किमंतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना वाहनासह ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. पनवेल (Panvel) येथील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने कार्यालयास मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार 12 जून रोजी सांयकाळी पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजूस असलेल्या स्टार वेल्डींग वर्कसच्या समोर छापा टाकला. या धाडीत गांजा या अंमली पदार्थाचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. 


पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी 7 वाजता तळोजा याठिकाणी छापा टाकला असता एक महिन्द्रा कंपनीची XUV 500 गाडीमध्ये इसम 1) आरिफ जाकीर शेख वय 25 वर्षे रा. रूम नं. 12, तळ मजला, ब्लॉक नं. ए 78, कोकरी आगर जवळ म्हाडा चाळ, सायन कोळीवाडा, मुंबई 400037 आणि 2) परवेझ बाबुअली शेख वय 29 वर्षे रा.रूम नं. 13, तळ मजला, ब्लॉक नं. ए 78, कोकरी आगर जवळ म्हाडा चाळ, सायन कोळीवाडा, मुंबई 400037 यांच्या ताबे कब्जात पांढऱ्या रंगाच्या नायलॉन गोण्यामध्ये अंदाजे 494 किलो, 1 कोटी रूपयांपेक्षा जास्त किमंतीचा गांजाचा साठा मिळून आला. सदर आरोपी इसमांच्या ताब्यातून एकूण 1,13,90,000 रुपये किमंतीचा गांजा, वाहन व मोबाईल असा मुद्देमाल एनडीपीएस कायदा 1985 अन्वये जप्त करण्यात आला आहे. 


पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करुन आरोपी 1 व 2 यांना गुन्हयाच्या पुढील तपासकामी अटक केली आहे. आरोपींविरूध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 20 (ब) (II), 29 तसेच भा.द.स. कलम 328 अन्वये त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयामध्ये अंतरराज्यीय टोळी असण्याची दाट शक्यता आहे. सदर कारवाई  पोलीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे संचालक, उप-आयुक्त प्रदिप पवार, आर.आर.कोले यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर.डी. पाटणे, निरीक्षक उत्तम आकाड, दुय्यम निरीक्षक डी.सी.लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी.निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, तसेच सहायक दु.नि. जी.सी. पालवे, महिला जवान आर.डी.कांबळे, निशा ठाकुर, जवान ज्ञानेश्वर पोटे, सचिन कदम, हे सहभागी होते.


हेही वाचा


Nashik Crime : सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा