मुंबई : पोलीस दलात कार्यरत असताना ऑनलाइन गेमिंगचं (Online Gaming) वेड पोलीस कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडला आहे. ड्रीम 11 आणि क्रिकबज सारख्या ऑनलाइन गेमिंगमुळे पोलीस कर्मचारी तब्बल 62 लाखांच्या कर्जात बुडाला. हेच कर्ज फेडण्यासाठी त्याने वर्दीच्या मागे लुटमारीचा मार्ग निवडला. त्याने लुटमारी करत असतानाच त्याने दोन तरुणांवर गोळाबार केला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. मात्र घटनास्थळी दुचाकी सोडून पळाल्याने तो पोलिसांच्या तावडीत  सापडला. सूरज देवराम ढोकरे (वय 37) असे अटक हवालदाराचे नाव आहे. तर अजीम अस्लम सय्यद (30) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र  फिरोज रफिक शेख (27) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी भिवंडी तालुक्यातील अंबाडी - वाशिंद रोडवरील पाईपलाईनजवळ मैदे गावच्या हद्दीत दुचाकीवरून विरार पूर्व मधील चंदनसार येथे राहणारे फिरोज आणि मृत अजीम हे त्यांच्या नातेवाईकांकडे जात होते. त्याच सुमाराला लुटमारीच्या उद्देशाने अंबाडी गावाच्या हद्दीत आरोपी हवालदार हा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवून होता. 


अंगावर दागिणे पाहिले आणि पाठलाग केला


दुचाकीवरून फिरोज आणि मृत अजीम हे जात होते त्यावेळी यांच्या अंगावर दागिने पाहून त्यांचा आरोपी हवलदाराने पाठलाग करत दोघांना निर्जन रस्त्यात अडवले. त्यानंतर  त्यांना धमकी देऊन अंगावरील दागिने हिसकावून घेत असतानाच मृत अजीमने झटापटी केली. त्यामुळे आरोपी हवलदाराकडे असलेल्या  सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने दोघांवर गोळीबार करत सहा राऊंड फायर केले. या गोळीबारात दोघेही गंभीर जखमी झाल्याचे पाहून त्याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीमध्ये बिघाड झाल्याने त्याने दुचाकी घटनास्थळी सोडून पळ काढला.


दरम्यान या घटनेची माहिती पडघा पोलीस पथकाला मिळताच पथकाने घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गणेशपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, शहापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस सुरेश मनोरे यांनी आरोपीला पकडण्यासाठी वेगाने सूत्र फिरवली होती. तसेच पडघा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मुदगन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, कसारा पोलीस ठाण्याचे सागर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पडघा, कसारा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली असता प्राथमिक तपासात दरोड्याच्या उद्देशाचा निष्कर्ष निघाला.


गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता हल्लेखोर अहमदनगर - नाशिक बसने पळून जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अहमदनगर पोलिसांच्या मदतीने बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका संशयितास शस्त्रासह शिर्डीतून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला 37 वर्षीय सूरज देवराम ढोकरे असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे  भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 48 तासात आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.  


पोलिसांनी गेल्या आठ दिवसापासून आरोपी हवलदाराकडे अधिक चौकशी केली. त्याने ऑनलाइन गेमिंगच्या नादात विविध बँक आणि पतपेढ्यांमधून 62 लाखांच्या कर्जात बुडाला. हेच कर्ज फेडण्यासाठी तेव्हा त्याने चोरी आणि दरोड्याचा मार्ग अवलंबल्याचे समोर आले.


दरम्यान 16 ऑक्टोंबर रोजी अजीमचा मुंबई येथील  रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पडघा पोलिसांनी अटक हवालदारावर हत्येचाही गुन्हा दाखल करण्यात आला. नऊ दिवसापासून तो पोलीस कोठडीत असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे एसपी  विक्रम देशमाने त्यांनी दिली आहे. अटक आरोपी हवालदार यापूर्वीही अंबाडी भागात येऊन ग्रामीण भागातील नागरिकांना धमकी देऊन हजारो रुपये घेऊन जात होता. याच हजारो रुपयातून तो कर्ज फेडत होता. मात्र लुटमारी करत असतानाच त्याने केलेल्या गोळीबारात एका निष्पाप तरुणाचा बळी गेला.  तर याआधीही आरोपीकडून अशाच प्रकारची घटना घडली आहे का  आणखी काही गुन्हे घडले आहेत का? याचा तपास पडघा पोलीस करत असल्याची माहिती एसपी  विक्रम देशमाने यांनी आज (सोमवारी) भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.


ही बातमी वाचा: