ठाणे : कर्ज रिकव्हरी एजंट असणाऱ्यांनी आपला मोर्चा चोरीकडे वळवला आणि तब्बल 18 रिक्षांची चोरी केली, आता त्यांना पोलिासांनी बेड्या ठोकल्या आहेत. मागील काही दिवसांमध्ये मुंबईसह ठाणे, भिवंडी (Bhiwandi Crime News) येथे रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याने पोलिस आयुक्तांनी पोलिस पथकांना विशेष लक्ष घालून मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने चार जणांच्या टोळीला ताब्यात घेत त्यांच्याककडून 20 लाख रुपयांच्या 18 रिक्षा जप्त केल्या.
पोलिसांनी या चोरांकडून 12 गुन्ह्यांची उकल केली आहे अशी माहिती गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी भिवंडीत पत्रकार परिषदेत दिली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
रिक्षा ज्या भागातून चोरीस गेल्या होत्या त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. रिक्षा चोरी करणारे भिवंडी शहरातील नदी नाका येथे रिक्षा विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत त्या ठिकाणी रशीद युनुस खान,वय 38, रा. अंधेरी प. मुंबई, सय्यद अली मोहम्मद अली शेख उर्फ मुन्ना,वय 38,रा. मुंब्रा, ठाणे, एहतेशाम अब्दुल समी सिद्दीकी, वय 42,रा. कौसा, मुंब्रा, ठाणे आणि जमील अहमद मोहम्मद तय्यब अन्सारी, वय 35, रा. सिद्धीकीनगर, धुळे या चौघांना ताब्यात घेतलं. त्याच्या ताब्यातून ओशिवरा आणि जुहू पोलिस ठाणे हद्दीतून चोरी झालेल्या दोन रिक्षा जप्त केल्या. या चौकडीकडे अधिक तपास केला असता त्याच्या ताब्यातून एकूण 18 रिक्षा जप्त केल्या.
सय्यद अली मोहम्मद अली शेख उर्फ मुन्ना, एहतेशाम अब्दुल समी सिद्दीकी हे दोघे वाहन कर्जांचे हप्ते थकीत असलेली वाहने रिकव्हरी करणारे एजेंट म्हणून काम करीत होते. त्यांना रिकव्हरी कंपनीने काढून टाकल्याने त्यांना लॉक असलेली वाहनं लॉक तोडून सुरू करुन घेऊन जाण्याची पद्धत माहिती असल्याने त्यांनी आपला मोर्चा वाहन चोरीकडे वळवला.
या माध्यमातून चोरी केलेली वाहने धुळे येथील साथीदार जमील अहमद मोहम्मद तय्यब अन्सारी यास विक्री करीत होते. त्यानंतर तो या चोरी केलेल्या रिक्षा धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव या परिसरात विक्री करीत होता. अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
ही बातमी वाचा: