भंडारा : तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर त्यावर कारवाई करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना एका पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. भंडाऱ्यातील लाखनी ठाण्यात हा हवालदार ड्युटीवर होता. त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलं. राजेश भजने (49) असं अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. एका महिलेने बळजबरीने ताब्यात घेतलेलं घर खाली करुन देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
नागपूर इथे राहणाऱ्या एका इसमाचं भंडाऱ्याच्या लाखनी इथेही एक घर आहे. मात्र लाखनीतील घरात एका महिलेनं घराचं कुलूप तोडून तिच्या मुलासह बळजबरीनं प्रवेश केला. या प्रकरणी तक्रारदाराने लाखनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
बळजबरीने घरात राहणाऱ्या महिलेसह तिच्या मुलाला घरातून बाहेर काढण्यासाठी लाखनी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजेश भजने याने तक्रारदारांना 20 हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणाची तक्रार भंडारा लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली.
लाचलुतपत विभागाच्या निर्देशाप्रमाणे त्या व्यक्तीने पाच हजारांचा पहिला हप्ता देण्यासाठी हवालदार राजेश भजने याला बोलावलं. त्यावेळी सापळा रचलेल्या लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केली. लाखनी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदाराला कर्तव्यावर असतानाच अटक करण्यात आल्यानं पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
कृषी विभागातील लाचखोर अधिकारी जाळ्यात
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून एसीबीने (ACB) कारवाईचा धडाका लावला असून अनेक सरकारी कर्मचारी व अधिकारी भ्रष्टाचाराच्या कचाट्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. नुकतेच एबीसीने सांगली (Sangli) जिल्ह्याच्या कृषी विभागातील गुण नियंत्रकाला 30 हजाराची लाच घेताना अटक केली. कृषी औषध कंपनीच्या इमारतीसाठी निरीक्षण अहवाल देताना येथील गुण नियंत्रकाने लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजाराची लाच घेतांना सांगलीच्या लाच (Bribe) लुचपत विभागाने या गुण नियंत्रकास रंगेहाथ अटक केलीय. संतोष चौधरी असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव आहे.