भंडारा : आजच्या आधुनिक युगात मोबाईलला अनन्य साधारण महत्व आले आहे. लहान मुलांपासून थोर मोठ्यांना मोबाईलने वेड लावले आहे. मोबाईलमुळे अनेक तरुणाईला भुरळ पडल्याने अनेकांचे जीवन उध्वस्त झाले तर अनेक कुटुंबात कलह निर्माण करण्याचे कामसुद्धा मोबाईलने केले. मोबाईल काहींसाठी तारक तर अनेकांसाठी मारक ठरताना दिसत आहे. अशाच एक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. मोबाईल न मिळाल्याने रागावलेल्या पत्नीने आपल्या पतीचे विळ्याने ओठच कापल्याने खळबळ उडाली आहे.
मोबाईलच्या आहारी गेलेल्या पत्नीने पतीने हातातला मोबाईल न दिल्याने चक्क आपल्याच नवऱ्याला विळ्याने मारहाण करून त्याचे ओठच कापले. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे घडली आहे. खेमराज बाबुराव मूल वय 40 असे जखमी पतीचे नाव आहे. ह्या प्रकरणी आरोपी पत्नीविरुद्ध लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील 40 वर्षीय खेमराज मूल यांचा मोबाईल मागील तीन दिवसांअगोदर बिघडला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीचा मोबाईल काही दिवस वापरासाठी मागितला. त्यानंतर दोन दिवस होऊनही मोबाईल पत्नीला दिला नाही, त्यामुळेच्या रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. यात रागाच्या भरात पत्नी प्रेमीना खेमराज मुल हिने घराच्या खोलीत असलेला लोखंडी विळा आणून पती खेमराजच्या तोंडावर वार केला. त्यामुळे खेमराजचे ओठ कापले असून जबर दुखापत झाली. त्याला लागलीच लाखांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरच्या अहवालावरून आणि तक्रारदार खेमराज मूलच्या तोंडी तक्रारीवरून लाखांदुर पोलिसात पहाटे 1 वाजता आरोपी पत्नी प्रेमीना खेमराज मूल हिच्यावर कलम 324, 504 भादंवीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहे.
ही घटना घडल्यानंतर लाखांदूर तालुक्यात खळबळ पसरली आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, याचं प्रमाण शहरी भागात जास्त आहे. मात्र, आता ग्रामीण भागतही मोबाईलमुळे कुटुंबकहल वाढत असल्याने चिंत व्यक्त करण्यात येत आहे.