Bhandara Crime : थकीत बिल भरा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असा मेसेज जर तुमच्या मोबाईल फोनवर आला असेल तर तो खरा आहे की खोटा याची खात्री करुन घ्या. कारण थकीत वीज बिल भरण्याच्या नावाखाली भंडारा (Bhandara) इथल्या न्यायाधीशाची (Judge) एका भामट्याने तीन लाख रुपयांना ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा अज्ञाताविरोधात दाखल केला आहे. 


कशी झाली फसवणूक?
भंडारा इथले न्यायाधीश चारुदत्त लक्ष्मीकांत देशपांडे यांच्या मोबाईल फोनवर एक मेसेज आला होता. त्यात वीज बिल थकीत असून तात्काळ न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असं म्हटलं होतं. यावरुन न्यायाधीश देशपांडे यांनी संबंधित नंबरवर फोन केला. तेव्हा क्विक सपोर्ट हे अॅप इन्स्टॉल करण्यास सांगून त्यावर आलेली लिंक शेअर करुन 11 रुपये पाठवण्यास सांगितलं. न्यायाधीश देशपांडे यांनी 11 रुपये नेट बँकिंगद्वारे जमा केले असता त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून पहिल्यांदा 99 हजार 990 रुपये, दुसऱ्यांदा पुन्हा तेवढेच आणि तिसऱ्यांदा 99 हजार 998 रुपये असे एकूण 2 लाख 99 हजार 978 रुपये एका क्रेडिट कार्डद्वारे ट्रान्सफर झाल्याचं लक्षात आलं. हा प्रकार लक्षात येताच न्यायाधीश चारुदत्त देशपांडे यांनी भंडारा पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली. यावरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.


फास्टॅग रिचार्ज करणाऱ्या नागपुरातील महिला न्यायाधीशाला 2 लाख 75 हजारांचा गंडा 
न्यायाधीशांची फसवणूक केल्याच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. गुगलवरुन ॲप डाऊनलोड करत त्यातून 'फास्टॅग' रिचार्ज करणाऱ्या महिला न्यायाधीशाला सायबर चोरट्यांनी 2 लाख 75 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना नागपुरात मे महिन्यात घडली होती. सोनाली मुकुंद कनकदंडे यांना वाहनाचं 'फास्टॅग रिचार्ज' करायचं होतं. त्यासाठी त्यांनी गुगलवरुन फास्ट टॅग रिचार्ज ॲप डाऊनलोड केलं. दरम्यान त्यामध्ये बँकेचा डेबिट कार्ड नंबर टाकला. त्यातून फास्टॅग रिचार्ज केला. यानंतर त्यांनी मोबाईलवर नेटबँकिंग उघडले असता पासवर्ड आणि युजर आयडी 'इन हॅन्डलिंग' दाखवत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरला विचारणा केली. त्यावेळी त्यांच्या वेगवगळ्या खात्यातून 2 लाख 75 हजार 399 रुपये आरोपीने इतर खात्यात वळते केल्याचं समोर आले. याबाबत पोलिसांनी सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.


संबंधित बातमी


न्यायाधीशांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या, यवतमाळ पोलिसांची कारवाई