Beed Crime : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी या प्रकरणात अनेक धक्कादायक दावे केले आहेत. तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार वेगवेगळी आंदोलने सुरु आहेत. आज वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या, यासाठी एका महिलेने आंदोलन सुरू केले आहे. तर तीन दिवसापासून सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी उपोषण केले जात आहे. तिसरे आंदोलन शहरातील शस्त्र परवाने तपासून रद्द करण्यासाठी आणि अंजली दमानिया यांचेही सत्य शोधक आंदोलन सुरु आहे. त्यातच अंजली दमानिया यांनी बीडचे जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी अंजली दमानिया यांच्यावर निशाणा साधलाय.
सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी बीडचे जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांची भेट घेतली आहे. वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असलेल्या गणेश खडी क्रशर संदर्भात, तसेच बीडमध्ये एकूण किती दारूचे बार संदर्भात अंजली दमानिया यांनी माहिती मागितली आहे. याशिवाय काही गुंड त्रास देत असल्याच्या तक्रारी लोकांनी केल्या होत्या, त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
धक्कादायक माहिती समोर येणार : अंजली दमानिया
अंजली दमानिया म्हणाल्या की, आम्ही मागितलेली माहिती आल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येईल. फरार आरोपीच्या मोबाईलमधील माहिती समोर आल्याचे माध्यमातून कळले, पण त्यासाठी इतके दिवस का लागले? असा प्रश्न माझा आहे. यामध्ये एका बड्या नेत्यांचं नावं असल्याच्या ही चर्चा आहेत पण हा नेता कोण हे का सांगितलं जात नाही? आम्ही सत्यशोधक आंदोलन सुरु केलेलं होतं पण त्याबाजूला वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात 4-5 महिला बसल्या आहेत, आता त्यांना जाणीवपूर्वक कोणी बसवलं की काय असं वाटतं, पण हे चुकीचे सुरू आहे. या प्रकरणात अनेक चर्चा रंगतायत खरंतर cid ने याचे स्पष्टीकरण दिलं पाहिजे, काय सुरु आहे काय नाही हे सांगितलं पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
रिचार्जवाल्या ताईची लढाई प्रसिद्धीसाठीच : सुरज चव्हाण
दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्यावर 'एक्स'वर ट्विट करून निशाणा साधलाय. "अंजली दमानिया स्व. संतोष देशमुख हत्त्या प्रकरणी अडथळे निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करत आहेत. रिचार्ज वर चालणाऱ्या ताई नेमक्या कोणाला मदत करत आहेत. बीड पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे की, अंजली दमानिया यांना या प्रकरणापासून दूर ठेवावे. रिचार्जवाल्या ताईची लढाई स्व. संतोष देशमुख न्याय मिळवून देण्यापेक्षा प्रसिद्धीसाठी चालू आहे. अंजली दमानिया यांनी लक्षात ठेवावे की, सरकार गुन्हेगारांना सोडणार नाही", असे त्यांनी म्हटले आहे.
बुलढाण्यात सकल मराठा समाजाकडून मोर्चा
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा, हे सर्व प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा, या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे सकल मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सिंदखेड राजा येथे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी समाजाने आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमच्या पाठीमागे उभे राहावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संतोष देशमुख प्रकरणी अमित शाहांकडे जाणार: रामदास आठवले
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यांनीही संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य केले आहे. "मी या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन 22 दिवस उलटले असले तरी आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. ही फार गंभीर बाब आहे. तर या प्रकरणातील सोनावणे यांनी तक्रार केल्यानंतर 6 तारखेला गुन्हा दाखल झाला असता तर आज ही वेळ आली नसती", असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
Walmik Karad: फरार वाल्मिक कराड पोलीस दलातील अंगरक्षरकांना घेऊन महाकालाच्या दर्शनाला? 'ते' फोटो समोर