Beed News Update : बीडमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. चोरीची तक्रार देणाराच चोर निघालाय. मालकाचे तीन लाख रुपये अज्ञात चोरांनी लुटून घेऊन गेल्याची तक्रार करणाऱ्या नोकरानेच ही चोरी केली असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव मध्ये घडली आहे.
आष्टी तालुक्यातील धामणगांवहून वसूली करून घेऊन चाललेले पैसे अज्ञात चोरांनी अडवून लुटल्याचा बनाव करून मालकाचे 3 लाख 11 हजार लंपास केले होते. परंतु, मालकाला गंडा घालणाऱ्या मुनीमाला गजाआड करण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जुलै 2022 रोजी धामणगांव शिवारात फिर्यादी आदेश गौतम बोखारे ( रा. चोभा निमगाव) कडा येथील पटवा सप्लायर्स या दुकानात कामाला आहे. ग्रामीण भागातून दुकानाचे वसूल केलेले पैसे घेवून धामणगांव येथून कड्याकडे येथे जात असताना पाठीमागून आलेल्या स्विप्ट कारने फिर्यादीस आडवून दोन अनोळखी इसमांनी चाकुचा धाक दाखवून फिर्यादी जवळील तीन लाख 11 हजार रूपये असलेली पैशाची बँग जबरीने हिसकावून नेली होती.
गौतम बोखारे याने अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्ह्यातील आरोपींचा संमातर तपास करीत असताना पोलिसांना गोपनिय सुत्रधारांमार्फत बातमी मिळाली की, हा गुन्हा तक्रार देणाऱ्या गौतम बोखारे, महेश त्रिंबक करडुळे ( रा. धिर्डी ) यांनी संगनमताने केल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी नियोजन करून पथकास एक दिवस अगोदर पाठवून तंत्रशुध्द पध्दतीने तपास केला. यावेळी चोभानिमगाव येथून गौतम आणि महेश या दोघांना ताब्यात घेवून विचारपूस केली. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी संगनमताने प्लान करून चोरी केल्याची कबुली दिली.
फिर्यादी गौतम यानेच व्यापाऱ्याचे पैसे लुटण्याचा प्लान केला होता. लुटलेल्या मालाची अर्धी-अर्धी रक्कम वाटून घेण्याचे दोन्ही संशयितांना ठरवले होते. आरोपींच्या ताब्यातून मिळालेल्या रक्कमेचा पंचनामा करण्यात आला असून तो मुद्येमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याचा बाजून पोलिसांनी तपास सुरू केलाय, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या