बीड : अवैध गर्भपात प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एजंट अंगणवाडी सेविकेकडे सापडलेली रक्कम पाहून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. मनिषा सानप असं या अंगणवाडी सेविकेचं नाव आहे. महिलेच्या आलिशान बंगल्याची झाडाझडती घेतली असता रोख 29 लाख रुपयांची रक्कम आढळून आली आहे. यात पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. कोट्यवधींचे बंगलेही तिच्या नावावर आहेत. एजंटची एवढी संपत्ती असेल तर मुख्य सूत्रधाराची संपत्ती किती असेल याचा शोध पोलिसांनी सुरु आहे. तर याप्रकरणात दोन दिवसांपूर्वीच पाच जणांविरोधात बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील 30 वर्षीय शीतल गणेश गाडे या महिलेचा 5 जून रोजी मृत्यू झाला होता. मृत महिला चौथ्यांदा गर्भवती असताना अचानक त्यांना रक्तस्राव सुरु झाल्याने पहिल्यांदा तिला खासगी आणि तिथून जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. परंतु तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला. यात संशय आल्याने शवविच्छेदन करण्यात आले होते. यात हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी पती, सासरा, भाऊ, मनिषा सानप नावाची अंगणवाडी सेविका आणि एक लॅबमधील व्यक्ती याला ताब्यात घेतलं आहे
पोलिसांनी काल (8 जून) एजंट मनिषाच्या घराची रात्री झडती घेतली. यात रोख 29 लाख रुपये सापडले आहेत. खोके, कॉट, पर्स, डब्बे, कपाट आदी ठिकाणी 500 ते 2 हजार रुपयांच्या नोटांचे बंडल निघत असल्याने पोलीस देखील चक्रावून गेले होते तर एजंट मनिषाच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणी जमीन असल्याचं देखील उघड झालं आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरुच असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे अवैध गर्भपात करणार्या रॅकेटचा शोधामध्ये पोलिसांचं एक पथक औरंगाबादकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी नर्सचा मृतदेह सापडला
या अवैध गर्भपात प्रकरणी ज्या नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला तिचा मृतदेह सापडला. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचं कळल्यानंतर नर्स असलेल्या सीमा डोंगरे 7 जूनपासून पसार झाल्या होत्या. पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच बीड ग्रामीण पोलिसांना पालीच्या बिंदुसरा धरणामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची चौकशी केली असता हा मृतदेह गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या सीमा डोंगरे यांचा असल्याचं निष्पन्न झालं.
संबंधित बातम्या
Beed : बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपातांवरुन नीलम गोऱ्हे आक्रमक; प्रशासनाला दिले निर्देश
बीडमधील अवैध गर्भपात प्रकरणाला वेगळं वळण, आरोपी असलेल्या नर्सचा मृतदेह सापडल्याने खळबळ