Beed Crime News : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन चर्चेत असलेल्या बीडमध्ये (Beed) दररोज नवनवे प्रकार समोर येत आहेत. कधी मारहाण, कधी दहशत पसरवण्याचा प्रकार, कधी रिल्स, तर कधी बँकेच्या फसवणुकीमुळे कर्जबाजारीमुळे आत्महत्यासारख्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यातच, आता बीडमध्ये अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा (Beed Sexual Harrasement Case) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशातच बीडमधील खासगी क्लासमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षक विजय पवार विरोधात आणखी एका पालकाने तक्रार दाखल केली आहे.
विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या विजय पवार विरोधात आणखी एका पालकाने तक्रार केलीय. विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका विद्यार्थिनीला शाळेमध्ये झालेल्या वादाच्या कारणातून त्रास दिला गेल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे केलीय.
दोन वर्षापासून शिक्षक विभागाकडे पाठपुरावा, पण कारवाई नाही
माझ्या मुलीलाही शाळेबाहेर उभा करायचे. तर कधी केबिनमध्ये बोलावून बॅडटच करायचा, असा आरोप या पालकांनी विजय पवारवर केलाय. या सर्व प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी संबंधित पालकाने गेल्या दोन वर्षापासून शिक्षक विभागाकडे पाठपुरावा केला. परंतु अद्याप कारवाई झालेली नाही. आता पोलीस अधीक्षकांनी आवाहन करताच या पालकांनी समोर येत ही तक्रार केली. रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारीचे पत्र देण्यात आले असून या तक्रारीवर पोलीस अधीक्षकांकडून तपास केला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
शिक्षकांच्या पोलीस कोठडीत 5 जुलैपर्यंतची वाढ
विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीची छेड काढून क्लासेसच्या केबिनमध्ये लैंगिक छळ (Sexual Abuse) केला जात होता. घडलेला प्रकार मुलीने आपल्या मैत्रिणीला सांगितला. मात्र, शिक्षकांकडून होणारा त्रास असाह्य झाल्याने मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. या तक्रारीनंतर दोन्ही शिक्षकांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ही बातमी वाचा: