बीड: बीड जिल्ह्यातील मारहाणीच्या गुन्ह्यांमधील फरार असलेला आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या भाई (Satish Bhosale) याला बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे बेड्या ठोकण्यात आल्या. बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. सतीश भोसले उर्फ खोक्या भाई प्रयागराज विमानतळावरुन (Prayagraj Airport) पळण्याच्या तयारीत होता. तेव्हा पोलिसांनी खोक्या भाईच्या मुसक्या आवळल्या. काही दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये कुंभमेळा (Kumbh Mela 2025) भरला होता. कुंभमेळ्यात प्रयागातील संगमावर शाही स्नान करण्यासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये आले होते. त्याच प्रयागराजमध्ये पोलिसांनी खोक्या भाईला बेड्या ठोकल्या.

प्राथमिक माहितीनुसार, सतीश भोसले उर्फ खोक्या भाई सुरुवातीला बीड जिल्ह्यातच फिरत होता. मध्यंतरी त्याने एका मराठी वृत्तवाहिनीला सविस्तरपणे मुलाखत दिली होती. खोक्या भाई प्रसारमाध्यमांना मुलाखत देतो पण पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागत नाही, यावरुन बीड पोलिसांची कार्यक्षमता आणि विश्वासर्हेतवर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर सतीश भोसले याच्या तपासाला वेग आला होता. महाराष्ट्रात आपल्याला असलेला धोका वाढला आहे, आपण पकडले जाऊ शकते, हे खोक्याच्या लक्षात आले. त्यामुळे खोक्याने बस पकडून तातडीने प्रयागराज गाठले. इतक्या दूर आपल्याला कोणीही पकडणार नाही, याची खोक्या भाईला खात्री असावी. तो प्रयागराजमधूनही निघण्याच्या तयारीत होता. त्यावेळी पोलिसांनी प्रयागराज विमानतळावर सतीश भोसले याला अटक केली.

खोक्या भाई गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. बीड पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी दोन पथके तैनात केली होती. मात्र, दिवसरात्र मेहनत घेऊनही खोक्या भाई पोलिसांना सापडत नव्हता. अखेर खोक्या वापरत असलेल्या मोबाईल फोनचे लोकेशन पोलिसांना मिळाले आणि तो अडकला. 

खोक्या भाईला पोलिसांनी पकडले असले तरी यामध्ये बीड पोलिसांपेक्षा उत्तर प्रदेशच्या पोलिसांचे योगदान अधिक असल्याची चर्चा रंगली आहे. खोक्याला सकाळी प्रयागराज पोलिसांच्या ताब्या ठेवण्यात आले होते. त्यानंतर बीड पोलिसांची पथक खोक्याला घेऊन बीडच्या दिशेने रवाना झाले आहे. सतीश भोसलेला घेऊन पोलीस आज रात्री किंवा उद्या सकाळी पोलीस ठाण्यात पोहोचतील, अशी शक्यता आहे.

आणखी वाचा

लोक बायांवर पैसे उधळतात, मी मित्रासाठी उधळले तर काय झालं? खोक्या भाईचं 'बाणेदार' उत्तर

सुरेश धसांनी कृष्णा आंधळेचा अंदाज वर्तवला, मात्र कुंभमेळ्यात त्यांचाच पठ्ठ्या खोक्या सापडला!

सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....