Beed Crime : बीड जिल्ह्यातील परळी येथील रेल्वे स्थानक परिसरात (Parli Railway Station) अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (31 ऑगस्ट) दुपारी घडली. या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी (Police) बरकत नगर येथील आरोपीला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर (pandharpur) येथील एक दाम्पत्य रोजगाराच्या शोधात परळीत आले होते. रेल्वेने परळीत दाखल झाल्यानंतर वडील काही वेळासाठी स्टेशनच्या बाहेर गेले होते, तर आई रेल्वे स्थानक परिसरातच थांबली होती. त्यांच्यासोबत चार वर्षांची चिमुरडीही होती.
आई आजारी असल्यामुळे ती रेल्वे स्थानकावरच झोपून गेली. या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने संधी साधत बालिकेला जवळील एका ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर पीडित बालिका रडत आईकडे परत आली. आईने विचारपूस केल्यानंतर घटनेचा उलगडा झाला.
सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपीचा शोध
पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, त्यात एक इसम पीडित बालिकेला सोबत नेताना दिसून आला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत परळी शहरातील बरकत नगर भागातील संशयित आरोपीला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला आज (1 सप्टेंबर) न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पीडित बालिकेवर उपचार सुरू
घटनेनंतर पीडित बालिकेला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या