Crime News: मुले पळवणारी चोरांची टोळी समजून गैरसमजुतीतून चौघा साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना जत तालुक्यातील लवंगा येथे घडली आहे. उमदी पोलिसांकडून तातडीने कारवाई करून नागरिकाच्या तावडीतून साधूंना सोडवले गेलं आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलागत असणाऱ्या जत तालुक्यातील लवंगा येथे चार साधूंना गाडीतून ओढून पट्ट्याने, काठीने  मारहाण केल्याची निंदनीय घटना घडली आहे. यावेळी आम्ही साधू असल्याचे सांगूनही जमावाने न ऐकल्याने साधू मारहाणीत गंभीर जखमी झाले होते. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. याबाबत रात्री पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.


उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथून चार साधू  कर्नाटक येथे देवदर्शनासाठी गेले होते. कर्नाटक येथील देवदर्शन आटपून ते लवंगा मार्गे विजापूर येथे जात होते. दरम्यान रस्त्यात गाडी थांबवून विजापूर हा रस्ता कोणता आहे याबाबतची विचारणा एका विद्यार्थीस केली असता पोरे चोरणारी टोळी समजून चारही साधूना गाडीतून ओढून काठीने, पट्ट्याने मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तालुक्यात सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर हा  प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावेळी साधूनी आपले ओळखपत्र, आधार कार्ड याबाबतची सविस्तर माहिती जमावाला देऊन ही जमावाने न ऐकल्याने हा प्रकार घडला आहे.


चोर समजून पायी जाणाऱ्या मजुराला जमावाची मारहाण


या घटनेसारखीच एक घटना नांदेडमध्ये ही घडली होती. येथे बस बंद असल्याने पायी प्रवास करणाऱ्या मजुराला चोर समजून जमवाने जबर मारहाण केली होती. 2021 मध्ये नांदेड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने गाव पातळीवरील जनता भयभीत झाले होते. त्यामुळे गावातील तरुणांनी 'आपलं गाव आपली सुरक्षा' म्हणत एकत्र येत रात्रीला गस्त घालण्यास सुरूवात केली होती. यावेळी तरूण गस्तीवर असताना त्यांना कोणीतरी चालत जात असल्याचे दिसले. त्यामुळे तरूणांनी त्याला बेदम मारहाण केली. यानंतर घटनेची माहिती इस्लापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मजुराचा जीव वाचवला. संबंधित अनोळखी तरुणास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, हा तरुण मध्यप्रदेशातील असून तो कामाच्या निमित्ताने तेलंगणातून महाराष्ट्रात येत होता अशी माहिती समोर आली.   


संबंधित बातमी: 


चोर समजून पायी जाणाऱ्या मजुराला जमावाची मारहाण, नांदेडमधील घटना