Barshi Police Latest News in Marathi : सोलापुरातील बार्शी ग्रामीण पोलिसांनी विदेशी दारु जप्त केली आहे. आंतरजिल्हा दरोडे आणि चोरी करणाऱ्या आरोपीकडून बार्शी ग्रामीण पोलिसांनी तब्बल 33 लाख 33 हजार रुपयांची विदेशी दारु जप्त केली आहे. पोलीस नाईक आप्पासाहेब लोहार आणि पोलीस नाईक महेश डोंगरे यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई करण्यात आली. इतर पाच आरोपी फरार झाले आहेत. 20 वर्षीय रामा शंकर काळे याला पोलिसींनी अटक केली आहे. हा मूळचा कळंबमधील कन्हेरवाडी या गावाचा आहे.  बिभीषण काळे, पल्या बिभीषण काळे, अमोल नाना काळे, चंदर भास्कर काळे, सुभाष लाला काळे फरार आहेत. हे सर्वजण कळंब तालुक्यातील आंदोरा गावातील आहेत. पोलीस यांचा शोध घेत आहेत.  अपर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या नेतृत्वात बार्शी पोलिसांनी शुक्रवारी मोठी कारवाई केली.  


मागील काही दिवसांपासून बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडाच्या प्रकार घडत होते. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हे कमी करण्यासाठी  पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपूते यांनी पेट्रोलींग वाढवण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस नाईक आप्पासाहेब लोहार आणि महेश डोंगरे बार्शी बायपास रोडला पेट्रोलींग करत होते. पेट्रोलिंग करत असताना महेश डोंगरे आणि आप्पासाहेब लोहार यांना जामगाव हद्दीत बाळराजे चौकात एक कार संशयीत उभी असल्याची माहीती मिळाली. त्यावेळी ते मदतीसाठी पोलीस पथकासह गेले. त्यावेळी गाडीमधील व्यक्तीकडे चौकशी केली. पोलीस आल्यामुळे आरोपींनी धूम ठोकली. त्यावेळी बार्शी पोलिसांनी शिताफिनं त्यातील एका व्यक्तीला अटक केली. पाच जणांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला. 


 अटक करण्यात आलेल्या 20 वर्षीय आरोपीची पोलिसांनी कसूच चौकशी केली. त्याने पहिल्यांदा माहिती देण्यास नकार दिला. पण पोलिसांनी खाकी दाखवताच त्यानं सर्व माहिती दिली. पोलिसांनी गाडीमधील (MH 05 AX-1286 ) विदेशी दारु जप्त केली. त्याशिवाय गाडीमध्ये एक तलवार, टामी, कटावणी, स्क्रु ड्राईव्ह, मिरची पूड पोलिसांना मिळाली. गाडीमधील सामान पाहाता पोलिसांनी हे आरोपी दरोड्याच्या तयारीत असल्याचं समजलं.  


अटक करण्यात आलेल्या आरोपीसह फरार आरोपींवर उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे असल्याचं समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची पोलीस कसून चौकशी करत आहेत. तसेच फरार आरोपींचा शोध घेत आहेत. सहाही आरोपींकडे मिळालेल्या साहित्यावरुन ते दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे बार्शी पोलिसांनी आरोपीवर गु.र.नं. 274/22 भादवि कलम 399 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 प्रमाणे गुन्हा दाखल केला. अटक करण्यात आलेल्या आरोपीला खाक्या दाखवल्यानंतर गाडीतील विदेशी दारु त्यांनी मिरज येथील एक दुकानातून दरोडा टाकून आणल्याची कबुली दिली. आरोपीनं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जामगाव हद्दीतून 9 लाख रुपयांच्या ट्रक आणि 311 बॉक्समधील 33 लाख 33 हजार रुपयांची दारु जप्त केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीला बार्शी पोलिसांनी कोर्टात हजर केले असता  28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.