पुणे : फॉक्सकॉन प्रकल्प ( Foxconn project) गुजरातला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रोष आहे.महाविकास आघाडीचं सरकार असंत तर हा प्रकल्प महाराष्ट्रात शंभर टक्के आणला असता. परंतु, आज राज्यात कंपन्या येतात की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रकल्प कोणत्या राज्यात गेला याचं वाईट वाटत नाही.आपल्या तरूणांचा रोजगार बाहेर गेला यामुळे तरूणांच्या मनात सरकार विषयी रोष आहे. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येणार हे ठरलं असाताना सरकार बदलल्यानंतर लगेच तो गुजरातला कसा गेला? असा प्रश्न युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उपस्थित केला. सत्तांतर झालं नसतं आज हा प्रकल्प महाराष्ट्रात असता  असे देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.   
 
फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी युवासेनेचे कार्यकर्ते सरकारविरोधात आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.   


"गुजरातपेक्षा दहा हजार कोटी रूपयांची जास्त सबसीडी आपण देणार होतो. शिवाय आता गुजरातमध्ये  हा प्रकल्प बनत आहे त्यापेक्षा जास्त सुविधा महाविकास आघाडी सरकारने दिल्या होत्या. तरी देखील हा प्रकल्प गुजरातला गेला. आपल्या मुख्यमंत्र्यांना माहितीच नव्हतं की, फॉक्सकॉन प्रकल्प काय आहे आणि तो कोठून आलाय. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा फायदा घेत गुजरातनं हा प्रकल्प आपल्या राज्यात नेला. हा प्रकल्प गुजरातला गेला यात गुजरातचा आणि केंद्राचा दोष नाही तर राज्य सरकारच्या ना कर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला, अशी टीका आदित्य टाकरे यांनी यावेळी शिंदे सरकारवर केली.   


"यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहेच पण महाराष्ट्राच्या पाठीत देखील खंजीर खुपसला आहे. वेदांता बरोबर बल्क ड्रग्ज प्रकल्प देखील महाराष्ट्रातून निघून गेला आहे. बल्क ड्रग्ज प्रकल्पात देखील सत्तर हजार तरुणांना नोकर्‍या मिळणार होत्या असे सांगत रोजगारासाठी मुलाखती इतर राज्यातील शहरांमधेच का होतायत? महाराष्ट्रात का होत नाहीत? त्याबद्दल त्या कंपनीकडून महाराष्ट्रात त्या कामासाठी योग्य असं मनुष्यबळ नाही, असं स्पष्टीकरण देण्यात येतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या मुलाखती महारष्ट्रात घेऊन दाखवाव्यात असे आव्हान यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले. 
 
आदित्य ठाकरे म्हणाले, "मी वेदांत प्रक्लपाबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत यांना ट्विटरवर विचारले की वेदांत प्रकल्प कसा महाराष्ट्रातून गेला? तर त्यांनी माहिती घेऊन सांगतो, असं उत्तर दिलं. यांनी अमच्यावर 40 वार केले आहेतच पण महाराष्ट्राच्या तरुणाईवर का वार करत आहेत? हा प्रकल्प राज्यातून गेल्याबद्दल लोकांच्या मनात राग आहे. महाराष्ट्रात चांगल्या कंपनी येतील की नाही, तरुणांना रोजगार मिळेल की नाही हा प्रश्न पडलाय. जे खोके घेऊन सरकारमधे गेलेत त्यांना काहीतरी मिळेल. मात्र इतरांना काय मिळतय?  आमदार जसे महाराष्ट्रातून, गुजरात, गोवा आणि तिथून परत महाराष्ट्रात आणले तसे हा प्रकल्प तुम्ही पुन्हा महाराष्ट्रात आपणार आहात का?


लॉकडाऊन सुरु असताना अनिल अग्रवाल यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी उद्योगमंत्री अनिल देसाई आणि अनिल अग्रवाल यांच्याशी ओळख असल्याने प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. जानेवारी महिन्यात अनिल अग्रवाल यांच्यासोबत पहिली बैठक झाली. त्यानंतर मे महिन्यात दावोसमधे पुन्हा त्यांच्यासोबत बैठक झाली. मी केंद्र सरकारला दोष नाही देणार,गुजरातला दोष नाही देणार. पण मी दोष खोके सरकारला देणार. ते लक्ष ठेवून होते की महाराष्ट्रात कधी सत्तांतर होतेय आणि कधी आपण हा प्रकल्प पळतोय. हे सगळं ईडीच्या दबावामुळे झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात चार लाख कोटी रुपये गुंतवणूक येणार म्हणून खोटं सांगीतलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनिल अग्रवाल यांचा एकेरी उल्लेख केला. असा एकेरी उल्लेख करून चालत नाही. त्यांचा आदर सन्मान करावा लागतो, असा टोला यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. 


हे सरकार नाही, सर्कस आहे
यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोण माझ्या गटात येतो यासाठी प्रयत्न चालू आहेत. यानी केलेले चाळीस वार आम्ही पचवलेत. बारा खासदारांचे वार आम्ही पचवलेत. परंतु, आपल्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातील तरूणांवर वार का करता? असा सवाल उपस्थित करत हे सरकार नाही तर सर्कस असल्याची टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.