Baba Siddique Murder Case मुंबई: माजी राज्यमंत्री आणि अजित पवार यांच्या पक्षातील नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांची 12 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली. वांद्रेमधील कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरु असून यामध्ये विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. 


बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हत्या प्रकरणाचा गुन्हे शाखेचा तपास आता एसआरए कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांनी एसआरएला पत्र लिहून वांद्रे पूर्वेला असलेल्या एसआरए प्रकल्पाची माहिती मागवली आहे. बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी ज्या प्रकल्पाला विरोध करत होते, त्या वांद्रे पूर्व प्रकल्पाची माहिती गुन्हे शाखेने एसआरएकडून मागवली आहे. तसेच एसआरए प्रकल्पात काय चालले आहे?, या प्रकल्पातून कोणाला नफा मिळत आहे? आणि या प्रकल्पाची एकूण किंमत किती आहे, याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 


मला-माझ्या कुटुंबाला न्याय हवाय- झिशान सिद्दीकी


आमदार झिशान सिद्दीकी यांनी आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या भेटीनंतर झिशान सिद्दिकी यांनी 'माझ्या वडिलांनी गरीब, निष्पाप लोकांचे जीवन आणि घरांचे संरक्षण करताना जीव गमावला. त्यांचा मृत्यू व्यर्थ जाता कामा नये. तसेच त्याचं राजकारणदेखील होऊ नये. मला माझ्या कुटुंबाला न्याय हवाय, अशा मागणीची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 






लग्नाच्या वरातीत गोळीबारचा सराव-


उत्तर प्रदेशात लग्नाच्या वरातीत गोळीबार करण्याची प्रथा आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी शिवकुमार गौतमने काही वेळेस गावातील वरातींमध्ये हवेत गोळीबार केला होता आणि हेच पाहून शिवकुमार गौतमची निवड करण्यात आली होती. तसेच शिवकुमारनेच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्याचे तपासात दिसून येत आहे. या प्रकरणातील आरोपी स्नॅपचॅट, इन्स्टाद्वारे संवाद साधत असल्याचे चौकशीत समोर आले. चॅटिंगसाठी स्नॅपचॅट, तर इन्स्टाद्वारे व्हिडीओ कॉल करत असल्याचे समोर आले आहे. 


लॉरेन्स बिश्नोई साबरमती तुरुंगात-


लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगनं यापूर्वी 14 एप्रिल 2024 ला सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ऑगस्ट 2023 च्या सीआरपीसी कोडच्या सेक्शन 268 नुसार  बिश्नोईला साबरमती तुरुंगाबाहेर कोणत्याही कारणासाठी नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी एकदा लॉरेन्स बिश्नोईची कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईच्या कोठडीसाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आहे.


संबंधित बातमी:


बाबा सिद्दीकींच्या हत्येचा वेगळा अँगल समोर; लॉरेन्स बिश्नोईची दुश्मनी नव्हे तर कोट्यवधींच्या SRA प्रकल्पाचा विरोध नडला