मुंबई: अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली होती. वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शनच्या सिग्नलजवळ बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांचे कार्यालय आहे. याच परिसरात बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांनी गोळीबार केला. प्राथमिक माहितीनुसार, या तिघांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर सहा राऊंड फायर केले. यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत आणि डोक्याजवळ लागल्या. यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. यानंतर लिलावती रुग्णालयाबाहेर बाबा सिद्दिकी यांच्या समर्थकांनी प्रचंड मोठी गर्दी केली आहे.
बाबा सिद्दिकी हे मुंबईतील नामवंत नेत्यांपैकी एक होते. ते अनेक वर्षे काँग्रेस पक्षात होते. अलीकडेच बाबा सिद्दिकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दिकी शनिवारी मुंबईतील अजित पवार गटाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित नेत्यांशी संवाद साधला होता.
15 दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकींना जीवे मारण्याची धमकी
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी तोंडावर रुमाल बांधले होते. तीनपैकी दोन हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर बाबा सिद्दिकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासोबत एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात असायचा. मात्र, गोळीबारावेळी हा पोलीस कर्मचारी कुठे होता आणि नेमके काय घडले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
घटनास्थळी पोलीस दाखल
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता खेरवाडी जंक्शनच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. पोलिसांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला ती जागा पोलिसांनी बॅरिकेटिंग करुन बंदिस्त केली आहे. पोलीस आता याठिकाणी हत्येचा तपास करण्याच्यादृष्टीने काही पुरावे मिळतात का, हे पाहत आहेत. पोलिसांकडून अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
आणखी वाचा