नागपूर: अमरावतीच्या एका महिलेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कंपनीत भागीदारीच्या नावावर नागपुरातील एका व्यवसायीकाची 6 लाख रुपयांनी फसवणूक केली. ही घटना धंतोली पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविला आहे. स्नेहनगर परिसरात राहणारे सतिश रेडपाडे (53) हे व्यवसायी आहेत. त्यांची समर्थनगर, अजनी येथे इनोव्हेटीव्ह बायो सायन्स या नावाची घनकचरा व्यवस्थापन कंपनी आहे.
पाच वर्षांपूर्वी घनकचरा व्यवस्थापन या विषयावर अमरावतीला मिटींग होती. या मिटींगमध्ये रेहपाडे सहभागी झाले. विषयाचे गांर्भीय लक्षात घेता अनेक व्यवसायी आणि सामाजिक कार्यकर्तेसुध्दा उपस्थित होते. याच परिषदेला अमरावती येथील आरोपी मीना देशमुख (50) ही सुध्दा सहभागी झाली होती. बैठक आटोपल्यानंतर फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख झाली. आरोपीने विजयालक्ष्मी ऑर्गनीक कंपोस्ट अॅन्ड अॅग्रो नेवार या कंपनीची मालक असल्याचे फिर्यादीला सांगितले. तसेच घनकचरा संबधीत कामाविषयी सखोल चर्चा केली.
आर्थिक भागीदार बनण्याचा दिला प्रस्ताव
दरम्यान 2017 मध्ये आरोपी ही पतीसह फिर्यादीच्या धंतोली येथील कार्यालयात आली. आमच्याकडे अचलपूर येथील घनकचरा व्यवस्थापनाचा 30 लाख रुपयांचा प्रकल्प असल्याची माहिती दिली आणि त्यात आर्थिक भागीदार होण्याचा प्रस्ताव रेहपाडे यांना दिला. रेहपाडे तिच्या जाळ्यात अडकले. आर्थिक भागीदारीचा करारनामा सुध्दा करण्यात आला होता. रेहपाडे यांनी 26 मार्च 2018 पर्यंत वेगवेगळ्या तारखेत आरटीजीएसव्दारे मीनाच्या खात्यात 6 लाख रुपये जमा केले.
आरोपीची कोणतीही कंपनी नसल्याचे समजले
काही दिवसांनी फिर्यादीने प्रकल्पाच्या प्रगतीबाबत विचारणा केली असता आरोपीने टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादीला शंका आली. त्यांनी सखोल चौकशी केली असता उपरोक्त नावाची कंपनीच अस्तित्वात नसल्याचे समजले. त्यांनी दिलेली रक्कम परत मागितली मात्र, आरोपीने टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. या प्रकरणी फिर्यादीने न्यायालयाकडे धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार धंतोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला.