Amravati Crime : अनेकांना मोबाईल फोनवर गेम खेळण्याचं वेड असतं. यातून अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत. तर काही फेक मेसेजमुळे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकल्याचंही पाहिलं असेल. अशीच काहीशी घटना अमरावती (Amravati) जिल्ह्यात घडली. मोबाईल ॲपमधील ऑनलाईन गेम (Online Game) खेळल्यानंतर चार कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्याचा फेक मेसेज (Fake Message) आल्यावर महिलेने थेट दर्यापूर इथल्या बँक ऑफ महाराष्ट्राची (Bank of Maharashtra) शाखा गाठत आपल्या पैशांची मागणी केली. मात्र, असे पैसे खात्यात आले नसल्याचे सांगितल्याने महिलेने बँक कार्यालयात कमालीचा धुडगूस घातला. यावरुन गोंधळलेल्या बँक प्रशासनाने पोलिसांना पाचारण करत महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना काल (24 जानेवारी) घडली.


चार कोटी रुपयांचं बक्षीस मिळाल्याचा मेसेज


दर्यापुरातील बाभळी भागात राहणाऱ्या एक महिला गेल्या काही महिन्यापासून ऑनलाईन रमी आणि करोडपतीसारखे काही गेम खेळत होती. अशातच गेममध्ये रक्कम जिंकल्याचा मेसेज या महिलेच्या मोबाईल फोनवर आला. ऑनलाईन गेम खेळल्याबद्दल तब्बल चार कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्याचं या मेसेजमध्ये सांगण्यात आलं होतं. सोबतच चार कोटी रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करणार असल्याचं मेसेजमध्ये लिहिलेलं होतं. या मेसेजनंतर महिलेच्या आनंदाला पारावार उरला नाही. अत्यंत आनंदात ही महिला आपल्या मैत्रिणीसह बनोसा इथल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत आली आणि चार कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्याचं सांगत तिने बँक अधिकाऱ्याला माझ्या खात्यातून ही रक्कम काढायची असल्याचे सांगितले.


बँकेचं कामकाज तासभर ठप्प


बँक अधिकाऱ्याने तिच्या खात्याची तपासणी केली आणि परंतु खात्यात कोणतीच रक्कम जमा झालेली नसल्याचं महिलेला सांगितले. यावर ही महिला अत्यंत नाराज झाली. संतापलेल्या या महिनेले बँक अधिकाऱ्याला बरंच काही ऐकवत गोंधळ घालायला सुरुवात केली. "मला मिळालेली चार कोटी रुपयांची रक्कम बँकेच्या व्यवस्थापनाने गहाळ केली, असा थेट आरोपच ही महिला करु लागली. या गोंधळामुळे बँकेचे संपूर्ण कामकाज जवळपास तासभर बंद पडले. शेकडो ग्राहक या गोंधळामुळे ताटकळत उभे राहिले. 


अथक प्रयत्नांनंतर अखेर महिला पोलिसांच्या ताब्यात


अखेर बँक प्रशासनाने दर्यापूर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले. यावेळी सुद्धा या महिलेने भयंकर गोंधळ घातला. दर्यापूर पोलिसांनी महिलेला पोलीस स्टेशनला नेऊन या महिलेवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. परंतु आपल्याला आलेला मेसेज फेक असू शकतो याची तिला जराही कल्पना आली नाही. मोबाईल फोनवर मेसेज येताच तिने थेट बँकेत जाऊन गोंधळ घातला.