Amravati Murder Case : व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्याप्रकरणी अमरावती पोलिसांनी मुख्य आरोपी इरफान शेख याला न्यायालयात हजर केले होते. इरफान शेख याला न्यायालयाने 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला पोलिसांनी शनिवारी रात्री बेड्या ठोकल्या होत्या. त्याला आज न्यायालयात हजर केले होते. कोर्टाने त्याला आता सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अमरावती पोलिसांनी इरफान शेखला कोर्टात हजर करताना आपली बाजू मांडली. या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान शेख याची अधिक चौकशी करण्याची गरज आहे. त्यामुळे आम्हाला त्याची कस्टडी मिळाली, असे पोलिसांनी कोर्टात सांगितले. व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्याप्रकरणात पोलिस पैशाचा काही प्रकार आहे का? याचाही शोध घेत आहे. इरफान शेख ज्या रहबरिया एनजीओचा सदस्य होता, त्याची बँक डिटेल्स पोलीस एकत्र करत आहेत. दरम्यान, इरफान शेख याच्याकडे येणाऱ्या पैशांची माहिती मिळाल्यानंतर त्याची चौकशी करावी लागेल, त्यामुळे त्याची कस्टडी आम्हाला मिळावी, असा युक्तीवाद पोलिसांनी कोर्टात केला.
व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्याप्रकरणातील दुचाकीही पोलिसांनी अद्याप मिळालेली नाही. त्याशिवाय, पोलील एका कारचाही शोध घेत आहे, या कारचा वापर हत्यानंतर फरार होण्यासाठी करण्यात येणार होता. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. आरोपी इरफान शेख याच्या वकिलानेही कोर्टात युक्तीवाद केला. ते म्हणाले की, व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या झाली तेव्हा इरफान शेख तिथे उपस्थित नव्हता. बँक खात्याच्या तपशीलासाठी पोलीस बँकेकडून एक कॉपी घेऊ शकते, त्यामुळे आरोपीला पोलिसी कस्टडची गरज नाही.
कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकला. त्यानंतर कोर्टाने इरफान शेख याला सात जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली.
काय आहे प्रकरण?
नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. आजच केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.