Ambernath Crime News: अंबरनाथमध्ये (Ambernath News) एका तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. कारण ज्या तरुणावर गोळीबार झाला, तोच आरोपी निघाल्याचा प्रकार पोलीस चौकशीतून समोर आला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा कट रचण्यासह इतरही कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.


अंबरनाथ पश्चिम भागातील गणपत ढाबा परिसरात 15 जुलै दुपारी 1.30 वाजता अलोक आणि त्याचे काही मित्र या ठिकाणी एकत्र आले होते. तसेच, गेल्या काही दिवसांपासून विवेक नायडू यांचा बदला घेण्यासाठी आलोक यादव, चंदन भदोरिया आणि रोहित सिंह पुना हे मित्र याठिकाणी येऊन विवेकच्या हत्येचा कट रचण्यासाठी कल्याणहुन बदलापूरला आले होते. विवेक नायडू यानं काही दिवसांपूर्वी चंदन यांच्या भावावर कल्याणच्या काळा तलाव या ठिकाणी गोळीबार केला होता. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विवेक फरार झाला होता. भावावर गोळीबार झाल्याचा बदला घेण्यासाठी या मित्रांनी अंबरनाथ पश्चिम भागातील गणपत धाब्याजवळ एकत्र येत विवेकला संपवण्याचा कट रचला. हे सर्वजण आधी बारावी डॅमच्या एका फार्म हाऊसवर पार्टी करून बुलेट आणि पल्सर मोटरसायकल वरून कल्याणला जात होते. मात्र अंबरनाथच्या गणपत धाब्यासमोर आतिश पवार आणि त्याचा मित्र त्यांना भेटला. या अतिशसोबत चंदन याची बाचाबाची झाली चंदन भदोरियानं स्वतःजवळ असलेला गावठी कट्टा काढून विवेक नायडू याला याबाबतची माहिती दे नाहीतर तुला जीवे ठार मारणार, अशी धमकी दिली होती.


याच वेळी चंदन भदोरिया यांच्या हातातील गावठी कट्ट्यामधून गोळी सुटली आणि ती थेट अलोक याच्या उजव्या मांडीत घुसली. अतिश आणि त्याच्या मित्रानं या भागातून पळ काढला. चंदन भदोरिया आणि रोहित सिंह पुना यांनी जखमी अलोकला सर्वात आधी जेके हॉस्पिटल कल्याण येथे रिक्षातून नेलं. त्यानंतर उल्हासनगरच्या मॅक्स लाईफ हॉस्पिटलमध्ये अलोकला आणण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संपूर्ण प्रकार लक्षात घेत गुन्हा दाखल केला होता. मात्र यामध्ये आलोक आणि त्याच्या साथीदारानं खोटा बनाव रचून अलोकवर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला आहे, अशी माहिती पोलिसांना दिली. 


चौकशीनंतर पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांना अलोकसोबतच्या मित्रांची कसून चौकशी केली. त्यानंतर सर्व प्रकार समोर आला. या प्रकरणातील जखमी आरोपी अलोक यादव, रोहित सिंह पुना आणि मुख्य आरोपी चंदन भदोरिया या आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस आणि गुन्ह्यात वापरलेले मोटारसायकल पोलिसांनी जप्त केलं आहे. या सर्व आरोपींवर यापूर्वी देखील विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर यातील एक आरोपी फरार असल्याची माहिकी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.