ठाणे : हुंडा आणि सासरच्या छळाला कंटाळून एका 26 वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ (Ambernath) मधून समोर आली आहे. विशाखा टिळेकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar Police) मुख्य आरोपी डॉक्टर पतीसह सासरच्या तिघांना अटक (Husband Arrested) केली आहे.

Continues below advertisement

धक्कादायक बाब म्हणजे, या विकृत पतीने पत्नीच्या प्रत्येक हालचालीवर आणि ती कोणाशी बोलते यावर लक्ष ठेवण्यासाठी घरात आणि घराबाहेर चक्क सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) बसवले होते. 

Marriage Turned Nightmare : हातावरची मेहंदी सुकण्यापूर्वीच स्वप्नांचा चक्काचूर

विशाखाचा विवाह 30 एप्रिल 2026 रोजी अंबरनाथ येथील डॉ. नितीन टिळेकर याच्यासोबत मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नापूर्वी सर्वकाही व्यवस्थित होते, मात्र विशाखा सासरी पाऊल टाकताच तिचा छळ सुरू झाला. लग्नात अपेक्षेप्रमाणे मानपान मिळाला नाही, तसेच माहेरून आणखी पैसे आणि दागिने आणले नाहीत, या कारणावरून डॉ. नितीन आणि त्याच्या कुटुंबीयांनी विशाखाला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली.

Continues below advertisement

या डॉक्टर पतीची विकृती एवढ्यावरच थांबली नाही, तर विशाखाला माहेरच्यांशी किंवा बाहेरील कोणाशीही बोलण्याची परवानगी नव्हती. दोन दिवसांपूर्वी विशाखा शेजारच्या एका महिलेशी बोलली, याच कारणावरून नराधम पतीने तिला बेदम मारहाण (Domestic Violence) केली होती.

Ambernath Crime : पत्नीवर पाळत आणि घरात कैद

डॉ. नितीनने विशाखावर पाळत ठेवण्यासाठी घरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत केली होती. या असह्य त्रासाला कंटाळून विशाखाने अखेरचा फोन आपल्या आईला केला आणि तिचा होणारा सगळा छळ सांगितला. मुलीचा जीव धोक्यात असल्याचे समजताच आई-वडील तिला माहेरी आणण्यासाठी निघाले, पण ते अंबरनाथला पोहोचण्यापूर्वीच विशाखाने राहत्या घरात गळ्याला दोर लावून आत्महत्या (Suicide) केली होती.

लग्नात आम्ही आमच्या क्षमतेपेक्षा जास्त दिले, तरीही सासरचे समाधानी नव्हते. पैशांसाठी तिला रोज मारहाण करायचे आणि घरात कैद करून ठेवायचे. शिकलेला सवरलेला डॉक्टर जर हुंड्यासाठी असा नराधम बनत असेल, तर समाजाने विचार करण्याची वेळ आली आहे, अशी खंत विशाखाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. 

या प्रकरणी विशाखाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने पावले उचलत गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करणे (Abetment to Suicide), हुंड्यासाठी छळ करणे (Dowry Harassment) यासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

पोलिसांनी मुख्य आरोपी पती डॉ. नितीन टिळेकर, त्याची आई आणि भाऊ या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

हुंड्यापाई एका हसत्याखेळत्या सुशिक्षित तरुणीचा असा करुण अंत झाल्याने अंबरनाथ परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही बातमी वाचा :