Ambarnath Crime : अंबरनाथमध्ये (Ambarnath) एका कंपनीत सिक्युरिटी गार्डनेच (Security Guard) चोरी केली आणि नंतर स्वतःच चिठ्ठी लिहून या चोरीची कबुली दिल्याचा प्रकार समोर आला आहे. वरिष्ठांकडून होत असलेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी ही चोरी केल्याची कबुली या सिक्युरिटी गार्डने दिली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक केली आहे. तसंच 82 लाख 50 हजार रुपयांच्या स्टील शीटचा बंडल सुद्धा जप्त केला आहे.


काय आहे नेमकं प्रकरण?
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत युनिफॅब इंजिनिअरिंग कंपनी आहे. या कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या अर्जुन बोराह याने कंपनीच्या गोदामात ठेवलेल्या स्टीलच्या शीटचा बंडल साथीदारांच्या मदतीने चोरला आणि तो भंगारात विकून गावी निघून गेला. मे 2022  ते ऑगस्ट 2022 दरम्यान ही चोरीची घटना घडली. त्यानंतर एक दिवस चार अनोळखी इसमांनी कंपनीत येऊन इथे शिट्स विकल्या जातात का? याबाबतची चौकशी करुन अर्जुन नावाच्या मॅनेजरने आम्हाला ही माहिती दिल्याचं सांगितलं. त्यामुळे कंपनीने अर्जुन ज्या सिक्युरिटी एजन्सीत काम करतो, त्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. कंपनीने माहितीच्या आधारावर सिक्युरिटी एजन्सीने तपासणी केली. तसंच अर्जुनचा ड्रॉव्हर उघडून पाहिला. यावेळी त्यात एक चिठ्ठी आढळून आली, ज्यात चोरीचा मास्टरमाईंड कोण आहे, चोरीचा माल कोणाला विकला? त्यांची नावं आणि नंबर होते. तसंच आपल्याला आपल्या सिक्युरिटी एजन्सीच्या वरिष्ठांनी वाईट काळात साथ दिली नाही, उलट जास्त काम करवून घेत कमी पैसे देऊन अन्याय केला, त्यामुळेच हा बदला घेत असल्याचं या चिठ्ठीत नमूद करण्यात आलं होतं. 


अपहाराचा गुन्हा दाखल, सहा जण अटकेत
त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख आणि उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी तपासाची चक्र फिरवत सहा जणांना अटक केली असून अद्याप मुख्य सूत्रधार फरार आहे. तसंच त्यांच्याकडून चोरलेला तब्बल 82 लाख 50 हजार रुपयांचा स्टील शीटचा बंडल सुद्धा जप्त करण्यात आलाय. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होतं आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या