अकोला: अकोल्यात बिष्णोई गँगकडून सलग दुसऱ्या आमदाराला खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. अकोटचे भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यानंतर आता अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगचा म्होरक्या शुभम लोणकरकडून 10  कोटीच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. 

Continues below advertisement

काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना 17 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता च्या दरम्यान धमकीचा कॉल आल्याची माहिती आहे.  "दोन दिवसात 10 कोटी रुपये दे.‌ नाहीतर दोन दिवसात तुझा गेम करू", अशी शुभम लोणकरकडून आमदार पठाण यांना धमकी देण्यात आली आहे. शुभम लोणकरकडून आलेला कॉल हा कॅलिफोर्नियावरून आल्याचं समोर आलं आहे. 

आमदार पठाण यांना आलेल्या धमकीनंतर गेल्या तीन दिवसांपासून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली. चार शस्त्रधारी पोलीस पठाण यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. धमकी प्रकरणात आमदार पठाण आणि पोलिसांकडून अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली आहे.  धमकीनंतर आमदार पठाण यांची जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बैठक झाली. साजिद खन पठाण यांनी धमकीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे तक्रार दिली आहे. बिश्नोई गँगचा म्होरक्या शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या नेव्होरी बुद्रुक गावचा रहिवासी आहे. शुभम लोणकरकडून दोन आमदारांना धमक्या आल्याने अकोला पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. 

Continues below advertisement

कोण आहे शुभम लोणकर

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची आणि आता रोहीत शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी शुभम लोणकर यानं स्वीकारली होती. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी गावाचा रहिवासी आहे. या आधीही शुभम लोणकर याच्यावर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल 3 पिस्टलसह काही जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त केल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केले होते. 

शुभम लोणकर हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार होता. अकोट पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक खरेदी करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. 'तो' गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वारजे शहरात रहायचा, त्यानंतर तो फरार होता. त्यावेळी शुभमला पुण्यातून अटक झाली होती त्यानंतर त्याची जमिनावर सुटका झाली होती. शुभम लोणकर आणि लॉरेन्स बिश्नोई या दोघांच्या संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. शुभमचे नेटवर्क दुबई आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पसरले आहे. त्यांचं अकोल्यातील नेव्होरी गावात घर असून त्याच्या घराला अनेक दिवसांपासून कुलूप लागलं आहे. तर, रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी देखील शुभम लोणकर याने स्वीकारली होती.