Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरातील दिल्लीगेट परिसरातील म्युनिसिपल कॉलनीत गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. लाठ्याकाठ्यांनी एकमेकांवर तुटून पडलेल्या या झटापटीत काही महिला आणि युवक जखमी झाले असून, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि तोडफोड झाल्याचे समजते. (Ahilyanagar Crime News)
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी झालेल्या यात्रेदरम्यान डीजे बंद करण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्याच वादाच्या राग मनात धरून गुरुवारी सायंकाळी सुमारे 10 ते 12 जणांच्या जमावाने चव्हाण कुटुंबाच्या घरावर आणि कार्यालयावर लाठ्याकाठ्यांनी अचानक हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यात चव्हाण कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली, तसेच परिसरातील काही गाड्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले.
अद्याप गुन्हा दाखल नाही
ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. झटापटीत जखमी झालेल्यांना तत्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, घटनेनंतरही अद्याप तोफखाना पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
Ahilyanagar Crime : एमआयडीसी भागातून व्यावसायिकाचे अपहरण, गुन्हा दाखल
दरम्यान, अहिल्यानगर येथे गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एमआयडीसी भागात एका व्यावसायिकाचे अपहरण करून जबरदस्तीने त्याच्या मोबाईलमधून फोन पेव्दारे 1 लाख 40 हजार रूपये उकळण्यात आले. त्यानंतर खिशातील 20 हजार रूपयेही हिसकावून घेण्यात आले. या प्रकारानंतर व्यावसायिकाला लाथाबुक्यांनी मारहाण करत त्यांना वाहनामधून खाली फेकून देण्यात आले.दरम्यान, ही घटना 6 जुलै रोजी 11:30 वाजता सायबन रस्ता, एमआयडीसी परिसरात घडली असून या प्रकरणी 23 जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा करण्यात आला आहे.
सुरेश सखाहारी म्हसे (43, रा. डेअरी चौक, शेंडी बायपास, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. सुरेश हे आपल्या कामानिमित्त एमआयडीसी भागातील सायबन रस्त्यावर 6 जुलै रोजी 11.30 च्या सुमारास गेले होते. यावेळी स्वप्नील व्यंकटेश मेहेत्रे, हर्षद गौतम गायकवाड, विश्वजीत वसंत माने (सर्व रा. वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर) आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांच्या मार्गात काळ्या रंगाचे चारचाकी वाहन आडवे लावले. संशयित आरोपींनी त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवले आणि मोबाईलमधून फोन पे अॅपव्दारे संशयित आरोपी स्वप्नील मेहेत्रेच्या खात्यात 1 लाख 40 हजार रूपये ट्रान्सफर करायला लावले. त्यानंतर खिशातील 20 हजार रूपये काढून घेतले. यानंतर संशयित आरोपींनी त्यांना मारहाण करून वाहनातून खाली फेकले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा
VIDEO : वाळू तस्करांना पकडण्यासाठी तहसीलदारांनी नदीत उडी मारली, पोहत जाऊन पाठलाग