Abhishek Ghosalkar : मुंबईतील दहिसर भागातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा (Morris Noronha) नावाच्या स्वयंघोषित नेत्यानं हा गोळीबार केला. मॉरिस नोरोन्हानं नंतर स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली. तब्बल 40 मिनिटे फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर (Abhishek Ghosalkar Facebook Live) अभिषेक घोसाळकर यांनी शेवटी 'गॉड ब्लेस यू' असं म्हटलं आणि मारेकरी मॉरिस नोरोन्हाने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. 


अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा गुरुवारी संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. तब्बल 40 मिनिटे हे फेसबुक लाईव्ह सुरू होतं. फेसबुक लाईव्ह जेव्हा संपत आलं होतं, तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, पिस्तुल काढलं, आणि पुन्हा खोलीत शिरून त्याने घोसाळकरांवर गोळीबार केला. गोळीबारामुळे अभिषेक घोसाळकर जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीनं करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही मिनिटांत त्यांच्यावर गोळ्या काढण्याची शस्त्रक्रिया सुरू झाली. मात्र अति रक्तस्त्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला.


अभिषेक घोसाळकर यांचे शेवटचे शब्द काय?


मी या आधी खूप काही बोललोय, आता जास्त काही बोलणार नाही, कारण बाहेर लोक वाट पाहताहेत. काही दिवसांपूर्वी आमच्या दोघांमध्ये गैरसमज झाला होता, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज झाला होता. आता हा गैरसमज दूर झाला असून एका चांगल्या कामासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. पुढे जाऊन आम्हाला खूप काम करायचं आहे. ही सुरूवात आहे. या नव्या सुरुवातीला आम्ही गरजू आणि गरीब लोकांना मदत करत आहोत. असंच काम करत राहू. गॉड ब्लेस यू. 


पैशाच्या व्यवहारातून गोळीबार झाल्याची माहिती


मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार पैशाच्या व्यवहारातून केला असल्याचं समोर आलं आहे. वर्षभरापूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाला होता. पण आता तो मिटल्याने ते एकत्र आले होते. मॉरिसने अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घालत नंतर स्वतःवरही गोळी झा़डून घेतली.


कोण आहे गोळीबार करणारा मॉरिस नोरोन्हा? (Who Is Moris) 


मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता.  


महाराष्ट्रात गुंडागर्दीचं राज्य? 


महाराष्ट्रात सध्या चाललंय तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला पडावा इतक्या भयंकर घटना सध्या या राज्यात घडतायत. कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची आधी पुण्यात त्याच्याच साथीदारांनी दिवसाढवळ्या, भर रस्त्यात हत्या केली. मग कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्थानकातच शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच, मुंबईतल्या दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडून त्यांची आज हत्या करण्यात आली. 


ही बातमी वाचा: