Vasai Murder Case: वसई : वसईमध्ये (Vasai Crime) प्रेयसीची प्रियकराकडून भरदिवसा हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. दिवसाढवळ्या करण्यात आलेल्या हत्येवेळी बघ्यांची गर्दी जमली होती. आजूबाजूला एवढी गर्दी असूनही तरूणीला एकहीजण वाचवायला पुढ सरसावला नाही. यावरुन संपूर्ण राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळलीय. मृत तरुणी आरती यादवच्या हत्येला आरोपी रोहीतबरोबरच बघ्यांची भूमिका घेणारे नागरीक आणि पोलीसही जबाबदार असल्याचं म्हणत तरुणीच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे.  


आरती यादवच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. आरतीवर काल रात्री आचोळे स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात आले आहेत. मृत आरतीचे वडील रामदुलारे हे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करायचे, तर आई निर्जलादेवी ही घरीच असायची. आरतीला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. बहिण सानिया (वय 16), भाऊ अंकित (वय 12), लहान बहिण आचल (वय 12) असं तिचं कुटुंब आहे. आरतीच्या घरची परिस्थिती तशी हलाखीची होती. त्यामुळे दहावीनंतर तिनं खाजगी कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली होती. 


आरतीच्या कुटुंबीयांनी काय सांगितलं? 


मृत आरती यादवच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहीतची आणि तरुणीची ओळख नालासोपारातच झाली. तब्बल सहा वर्षांपासून त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. आरतीच्या घरच्यांनी आरोपी रोहित आणि आरतीच्या लग्नाला होकारही दिला होता. मात्र, आरतीच्या घरच्यांनी होकार देण्यासोबतच एक अटही घातली होती. लग्नापूर्वी रोहितनं स्वतःच घर घ्यावं, अशी अट आरतीच्या कुटुंबीयांनी घातली होती. मात्र, रोहितकडे जॉब नसल्यामुळे त्यानं ही अट अमान्य केली आणि त्यानं नात्यासाठी असमर्थता दर्शवली. माझे कुटुंबीय दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देतायत, असं सांगून रोहितनं आरतीशी नातं तोडलं. 


शनिवारी 8 जूनला रोहितनं भर रस्त्यात आरतीला मारहाण केली होती. तिचा मोबाईल फोडला होता आणि तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याबबत आरतीनं आचोळे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी तक्रार  दाखल करुन घेतली. आणि रोहीतकडून पैसे घेवून त्याला सोडून दिल्याचा आरोप आरतीची बहिण सानिया हिने केला आहे. त्यामुळे रोहित जेवढा दोषी आहे तेवढाच हत्याकांडाच्यावेळी बघ्याची भूमिका घेणारे ते लोक, पैसै घेवून रोहितला सोडणारे पोलीस ही दोषी असल्याचा आरोप सानिया हिनं केला आहे.


पोलिसांच्या एकूण भूमिकवर ही चौकशी झाली पाहिजे : राजेंद्र गावीत 


नालासोपारा येथे मृतक आरती यादव हिच्या घरी पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावीत यांनी भेट दिली आणि यादव कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. आरती यादवच्या हत्येचा निषेध व्यक्त करत, हे विकृतीचं लक्षण असल्याच सांगून, वसई विरार मध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह उभा होत आहे.  या हत्याकांडाची चौकशी एस.आय.टी. मार्फत करण्याची मागणी करत, 1 जुलैपासून नवीन कायदा आला आहे. त्या कायद्यात या हत्याकांडाचा समावेश करण्यात यावा, जेणेकरून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल अशी मागणी गावीतांनी केली आहे. पोलिसांच्या एकूण भूमिकवर ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गावीत यांनी केली आहे.