अमरावती : अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीवर गावातीलच एका युवकाने बलात्कार केला होता. यामध्ये युवतीला गर्भधारणा झाली. सात महिन्यांची गर्भवती असताना युवतीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी युवतीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुद्ध बलात्कारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला रात्रीच अटक केली आहे.


दर्यापूर तालुक्याच्या येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात सतरा वर्षीय मुलीवर गावातीलच एका युवकाने जबरीने बलात्कार केला होता. ही घटना जानेवारी ते ऑगस्ट 2021 या काळात घडली आहे. यातूनच युवतीला गर्भधारणा झाली होती. दरम्यान युवती सात महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती मिळताच तिलाही धक्का बसला. यातूनच युवतीने 29 ऑगस्टला आत्महत्या केली होती. या प्रकरणी येवदा पोलिसांनी 29 ऑगस्टला आकस्मिक मृत्यूची नोंद करुन प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. दरम्यान 29 ऑगस्टला मृत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी येवदा पोलिसांत गावातीलच एका युवकाविरुद्ध तक्रार केली. 


या तक्रारीत नमूद केले की, त्या युवकानेच मुलीवर जबरीने बलात्कार केला होता. यातूनच तिला गर्भधारणा झाली आणि त्या धक्क्यामुळेच तीने आत्महत्या केली आहे. मुलीच्या गर्भधारणेसाठी आणि तिच्या आत्महत्येसाठी संबधित युवकच जबाबदार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून पोस्को, बलात्कार तसेच आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयित युवकाला अटक केली असल्याची माहिती येवदाचे ठाणेदार अमूल बच्छाव यांनी दिली आहे.