Jalna Bus Accident News : छत्रपती संभाजीनगरहून माहूरकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. जालन्याजवळील वखारी फाटा येथे हा अपघात झाला आहे. जालनाच्यापुढे माहूरकडे जाणारी बस आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. यात बस वाहक गंभीर जखमी झाला असून बसमधील 2 प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर 20 प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हा अपघात इतका भीषण होता की यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहे.
नक्षलविरोधी भूसुरुंगविरोधी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
दरम्यान अशीच एक अपघाताची घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांच्या नक्षल विरोधी भूसुरुंगविरोधी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला आहे. चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्लीजवळ भूसुरुंगविरोधी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे.
गणेश बाजीराव मडावी (वय 33 वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर रवी हनमंतु मडावी( वय 38 वर्ष), हा जखमी आहे. ते दोघे आष्टीहून लगामकडे दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी अहेरीहून गडचिरोलीकडे पोलिसांच्या नक्षल विरोधी ताफ्यातील भूसुरुंगविरोधी वाहन (एमपीव्ही- 0285) येत होते. चौडमपल्लीजवळ भूसुरुंगविरोधरी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. यात गणेश बाजीराव मडावी जागीच ठार झाला, तर रवी मडावी गंभीर जखमी झाला. रवीला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हे ही वाचा