Tax Scam:  बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटच्या कथित मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे. जीएसटी इंटेलिजेन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.  कर चोरी प्रकरणाचा हा मास्टरमाइंड देश सोडून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने गरीब नागरिकांच्या नावाने बोगस कंपन्या सुरू केल्या. त्यानंतर बोगस बिल चलान बनवून 176 कोटींची जीएसटी घोटाळा केला. 


GST इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की चेन्नईचे रहिवासी आणि त्याच्या साथीदारांनी गरीब लोकांना बँक कर्ज देण्याचे वचन दिले आणि प्रक्रियेसाठी त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड तपशील मिळवले. त्यानंतर त्याच्या नावावर अनेक बनावट कंपन्या उघडण्यात आल्या. 


अधिकाऱ्यांनी सांगितले की, फसवणूक करणाऱ्यांनी रिमोट ऍक्सेस सॉफ्टवेअर, विदेशी सिम कार्ड आणि विशेष फोनचा वापर केला. तथापि, इंटेलिजन्स युनिटने आयपी अॅड्रेस ट्रॅकिंग, गुप्त व्हॉट्सअॅप चॅट्सचे विश्लेषण आणि त्यांना पकडण्यासाठी अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.


GST इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  25 बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तर, 20 जीएसटी रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी मोबाईल फोन, मॉडेम, लॅपटॉप आणि सिम कार्ड जप्त केले आहेत. 


प्रकरण काय?


जीएसटी इंटेलिजन्स युनिटच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "कथित मास्टरमाइंडने अनेक शेल कंपन्या तयार केल्या होत्या. त्याद्वारे 973.64 कोटी रुपयांच्या करपात्र मूल्याची 175.88 कोटी रुपयांची बनावट बिले जारी करण्यात आली होती." अधिकाऱ्याने सांगितले की, त्या मास्टरमाइंडच्या साथीदाराला 22 जून रोजी अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे, मास्टरमाइंडला 23 जून रोजी बंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली. तो देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. 


महाराष्ट्रातही समोर आला घोटाळा 


काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील एका व्यक्तीला जीएसटी घोटाळेबाजांचा फटका बसला होता. सांगलीतील एका व्यक्तीला आयकर विभागाकडून आलेल्या नोटीसमध्ये त्याने दिल्ली येथे 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबर या दरम्यान सुमारे 18 कोटींचा व्यवसाय केला असल्याचे नमूद केले होते. ही नोटीस पाहून संबंधित व्यकी चक्रावली, कारण असे कोणतीही विक्री त्याने कधी केली नाही. त्याने त्या संदर्भात अधिक चौकशी केली असता दिल्ली येथे त्याचा PAN क्रमांक वापरुन घोटाळेबाज व्यक्तीने 18 कोटींचा व्यवसाय दाखवून सुमारे 3.5 कोटींच्या जीएसटीची चुकवेगिरी केली असल्याचे समोर आले. 


बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंची ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक


बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंची ओळखपत्र वापरुन क्रेडिट कार्ड बनवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. एका टोळीने अनेक अभिनेते आणि क्रिकेटपटूंच्या जीएसटी क्रमांकांवरुन पॅन कार्डचा डेटा चोरला आणि पुण्यातील फिनटेक स्टार्टअप 'वन कार्ड'कडून त्यांच्या नावाने जारी केलेली क्रेडिट कार्ड मिळवली आणि त्यावरुन खरेदी करत लाखो रुपयांची फसवणूक केली. बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटू यांचे GST क्रमांक ऑनलाईन उपलब्ध आहेत, अशी माहिती हॅकर्सना मिळाली होती. त्याच्या आधारे हॅकर्सनी बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटू यांचे PAN डिटेल्स काढले आणि त्याद्वारे त्यांच्या नावाने बनावट क्रेडिट कार्ड जारी करत फसवणूक केली.