Trending News: सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका कंपनीच्या फाउंडर आणि सीईओची (CEO) एक पोस्ट व्हायरल होत आहे. या सीईओनं एका महिलेला नोकरीची ऑफर दिली होती. पण त्याला महिलेनं दिलेलं उत्तर मात्र चर्चेचा विषय ठरतंय. ही घटना तब्बल दोन वर्षांपूर्वीची आहे. कंपनीचे सीईओ आज दोन वर्षानंतरही महिलेनं दिलेलं उत्तर विसरु शकलेले नाही. तो आजही महिलेच्या उत्तराचा विचार करत आहे. सीईओचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


एका कंपनीच्या संस्थापक आणि सीईओनं एका महिलेला नोकरीची ऑफर दिली. ही महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer) होती. सीईओनं महिलेला विचारलं होतं की, तुम्हाला माझ्या कंपनीत काम करण्यात रस आहे का? मात्र महिलेनं दिलेल्या उत्तरानं सीईओला विचार करण्यास भाग पाडलं. महिलेनं सीईओसमोर अत्यंत प्रामाणिकपणे आपला मुद्दा मांडला होता. खरं तर, हेल्थकेअर स्टार्टअप वॉलनटचे (Walnut)  फाउंडर आणि सीईओ रोशन पटेल (Roshan Patel) यांनी दोन वर्षांपूर्वी एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरला नोकरीची ऑफर दिली होती. 


दोन वर्षांपूर्वीची घटना 


वॉलनटचे फाउंडर आणि सीईओ रोशन पटेल यांनी सांगितलेला किस्सा 2021 चा आहे. त्यानंतर वॉलनटने प्री-सीड राउंडमध्ये निधी उभारला. तेव्हा रोशन पटेल आपली टीम वाढवण्याचा विचार करत होते. त्याला त्याच्या स्टार्टअपसाठी सक्षम लोकांची गरज होती. यादरम्यान त्यांनी एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरला नोकरीची ऑफर दिली. पटेल यांनी लिहिलं की, "माझ्याकडे एक स्टार्टअप आहे, जो हेल्थकेअर बजेटला अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही अलीकडेच प्री-सीड राउंड ऑफ फंडिंग वाढवलं ​​आहे. आम्हाला हुशार इंजिनिअर्सची गरज आहे. यासंदर्भात आपण बोलू शकतो का?"


महिलेचं सीईओला उत्तर...


महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरनं रोशन पटेल यांना उत्तर देताना लिहिलं की, तिचा सध्याची सीटीसी (CTC) वॉलनटच्या प्री-सीड राउंडमध्ये जमा झालेल्या फंडपेक्षा जास्त आहे. तेव्हापासून रोशन पटेल महिलेनं दिलेल्या उत्तराचाच विचार करत आहे. महिला इंजिनिअरनं रोशन पटेल यांना दिलेल्या उत्तरात लिहिलं होतं की, "हाय रोशन, मी आत्ताच क्रंचबेस वर चेक केलं आणि माझा सध्याचा पगार तुमच्या संपूर्ण प्री-सीड राउंड फंडपेक्षा जास्त आहे." महिलेचं हे उत्तर रोशन पटेल यांनी सोशल मीडियावरही शेअर केलं आहे. शेअर करताना रोशन पटेल यांनी लिहिलंय की, मी अजूनही दोन वर्षांपूर्वी झालेल्या या संवादाचा विचार करत आहे. पटेल यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.