IT Firm Wipro Layoffs : जागतिक मंदीच्या (Global Recession) सावटाखाली आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. आर्थिक मंदीच्या सावटाखाली कंपन्यांमधील कर्मचारी (Sacks Employees) कपातीचं सत्र सुरुच आहे. आता पुन्हा एकदा विप्रोकडून नोकरकपात (Wipro Layoff ) करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर टेक आणि आयटी कंपन्यांकडूनच गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना हटवण्यास सुरुवात केली होती आणि अजूनही नोकरकपात करण्यात आहे.
विप्रो कंपनीने 120 कर्मचाऱ्यांना कामावरून हटवलं
दिग्गज आयटी कंपनी विप्रोने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. विप्रो कंपनीने सुमारे 120 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. दरम्यान, ही नोकरकपात भारतात झालेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपनीने 100 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विप्रोच्या अमेरिकेतील 120 कर्मचार्यांना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे. आर्थिक मंदीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी विप्रो कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
'या' कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड
विप्रो कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रोसेसिंग एजंट आहेत. टीम लीडर आणि टीम मॅनेजरलाही हटवण्यात आलं आहे. अहवालानुसाप, ही नोकरकपात फक्त एका विशिष्ट विभागात करण्यात आली आहे. त्यामुळे इतर अमेरिकन कर्मचाऱ्यांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
आणखी कर्मचाऱ्यांना कामावरून हटवणार?
दरम्यान, विप्रो कंपनी सध्या अजून कर्मचाऱ्यांच्या छाटणीचा विचार नसल्याचं अहवालात सांगितलं आहे. सध्या कामावरून कमी केलेल्या 120 कर्मचाऱ्यांची छाटणी प्रक्रिया मे महिन्यात होईल. सध्या या कर्मचाऱ्यांना नोटीसचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. या काळात कंपनी त्यांना पगार आणि सुविधा देईल.
विप्रोकडून याआधीही 300 कर्मचाऱ्यांनी नारळ
आयटी कंपनी विप्रोकडून नोकरकपात करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही कंपनीने गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये कर्मचाऱ्यांना कामावरून हटवलं होतं. कंपनीने सप्टेंबर महिन्यात 300 कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता.
आर्थिक मंदीच्या भीतीमुळे नोकरकपातीचं सत्र सुरुच
आर्थिक मंदीच्या भीतीमुळे जगभरातील आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरकपात सुरू आहे. दिग्गज आयटी कंपनी विप्रोनं आपल्या काही कर्मचाऱ्यांना आधीच कामावरून काढून टाकलं आहे. आता पुन्हा एकदा 120 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. गुगल, मेटा, ट्विटर, टिकटॉक, डिस्नी, ओएलएक्स अशा अनेक कंपन्यांना आर्थिक मंदीच्या भीतीने खर्च कमी करण्यासाठी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Meta Layoffs : 'मेटा'मध्ये नोकरकपात सुरूच; 10 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड